निराधारांना भोजनाची व्यवस्था

हफीज घडीवाला
गुरुवार, 26 मार्च 2020


‘कोरोना’ विषाणूच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता.२५) उपविभागीय अधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत शहरातील रस्त्यावर भटकंती करणाऱ्या लोकांसाठी भोजनाची व्यवस्था, ग्रामीण भागातील नागरिकांना तीन महिन्याचा धान्य पुरवठा याचबरोबर इतर महत्वाच्या विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.

कंधार, (जि. नांदेड) ः ‘कोरोना’ विषाणूच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता.२५) उपविभागीय अधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत शहरातील रस्त्यावर भटकंती करणाऱ्या लोकांसाठी भोजनाची व्यवस्था, ग्रामीण भागातील नागरिकांना तीन महिन्याचा धान्य पुरवठा याचबरोबर इतर महत्वाच्या विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. या वेळी तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांना मुख्यालयी राहण्याची सक्त ताकीद देण्यात आली.

 

जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा
उपविभागीय अधिकारी पांडुरंग बोरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. जमावबंदी आदेश लागू असताना जीवनावश्यक वस्तूसाठी होणारी गर्दी कमी करण्यासाठी भाजीपाला व किराणा माल गल्ली, वार्ड निहाय वाटप करण्यात यावे, शहरात पालिकेतर्फे निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात यावी, ग्रामीण भागात ‘आरएस’ मार्फत फवारणी करावी, कुठल्याही परिस्थितीत जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होणार नाही, यासाठी प्रमुख अधिकाऱ्यांनी दक्ष राहण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

हेही वाचा -  रात्री व्हाॅट्सअपवर फोटो व्हायरल, जागले ते वाचले, झोपले ते कायमचे झोपले

रुग्णालयात तपासणी करून घ्यावी
‘कोरोना’च्या पादुर्भावाने नागरिकांनी घाबरून जाऊ नये, स्वतःची काळजी घ्यावी, घराबाहेर पडू नये, अफवा पसरू नये, ज्याला कोरोना पादुर्भावाची लक्षणे असल्याची शंका असेल त्याने न घाबरता रुग्णालयात तपासणी करून घ्यावी, असे आवाहन ‘एसडीओ’तर्फे करण्यात आले. या बैठकीस उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर कांबळे, तहसीलदार सखाराम मांडवघडे, गटविकास अधिकारी रहाटकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साहेबराव ढवळे, पोलिस निरीक्षक जाधव, नायब तहसीलदार विजय चव्हाण, पालिकेचे प्रतिनिधी जितेंद्र ठेवरे आदी उपस्थित होते.

 

तेलंगणा राज्यात अडकलेल्यांसाठी प्रयत्न
पोटाची खळगी भरण्यासाठी कंधार, लोहा आणि मुखेड तालुक्यातील जवळपास चार ते पाच हजार मजुरदार तेलंगणा राज्यात अडकून पडल्याची माहिती आहे. ‘लॉकडाऊन’ असल्याने त्यांना घरी परतण्यास अडचणी येत आहेत. अशांची माहिती घेऊन संबंधित तहसीलदारांच्या माध्यमातून त्या लोकांना तेथेच मदत मिळून देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे नायब तहसीलदार विजय चव्हाण यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Meals for the poor