विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी : वैद्यकीय पदव्युत्तर परीक्षेचा निकाल लागणार लवकर

विकास गाढवे
Thursday, 17 September 2020

काही दिवसांत राज्यभरात सरकारी आरोग्य यंत्रणेत तब्बल एक हजार ६०० नवीन डॉक्टरांची फौज दाखल होईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री व पालकमंत्री अमित देशमुख यांनी गुरूवारी (ता. १७) पत्रकार परिषदेत दिली.

लातूर : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने नुकत्याच वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा (पीजी) घेण्यात आल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सरकारी यंत्रणेकडे असलेला डॉक्टरांचा तुडवडा लक्षात घेता कोरोनामुळेच रखडेलेल्या परीक्षा तातडीने घेण्यासाठी पाठपुरावा केला. आता या परीक्षेचा निकालही तातडीने लावण्यात येत असून काही शाखांचा निकालही जाहिर झाला आहे.

यामुळे काही दिवसांत राज्यभरात सरकारी आरोग्य यंत्रणेत तब्बल एक हजार ६०० नवीन डॉक्टरांची फौज दाखल होईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री व पालकमंत्री अमित देशमुख यांनी गुरूवारी (ता. १७) पत्रकार परिषदेत दिली.

‘आरोग्या’त अखेर पदोन्नतीचा डोस, मराठवाड्याच्या वाट्याला ३२ अधिकारी

श्री. देशमुख म्हणाले, रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कोरोनाचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणेला डॉक्टरांची नितांत गरज होती. यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. परीक्षेसाठी आलेल्या अडचणी दूर केल्या. विद्यापीठ व राज्यपालांमध्ये दुवा म्हणून काम केले. यामुळे नुकत्याच परीक्षा पार पडल्या असून परीक्षेचा निकालही तातडीने जाहीर करून डॉक्टरांची उपलब्धता करण्यावर भर देण्यात येत आहे. या परीक्षेतून राज्यभरात एक हजार ६०० नवीन डॉक्टरांची फौज कोरानाच्या लढ्यासाठी दाखल होईल.``

जिल्ह्यात दीड हजार पथके
महाराष्ट्राला कोरोनामुक्त करण्यासाठी `माझे कुटूंब - माझी जबाबदारी` मोहिम हाती घेण्यात आली आहे. यात ट्रेस, ट्रॅक आणि ट्रीट या त्रिसूत्रीचा अवलंब रूग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन कोरोना आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.मोहिमेत नागरिकांची आरोग्य तपासणी होणार असून पूर्वीचे आजार असलेल्यांना उपचारासोबत आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे. जिल्ह्याची लोकसंख्या २७ लाख ७१ हजार ९९२ असून घरांची संख्या चार लाख ६८ हजार ४२३ आहे. प्रत्येक घराला भेट देऊन आरोग्य तपासणी करण्यासाठी एक हजार ५३५ पथकांची स्थापना केल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले.   

मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या वेळी सुरु झालेली प्रभातफेरी, आजही लातूर जिल्ह्यात...

सर्व बेड्स ऑक्सिजनयुक्त
जिल्ह्यात एक हजार ५२० ऑक्सिजन तर ३३३ आयसीयू बेड्स आहेत. यात कोरोनाच्या रूग्णांसाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजन बेडची संख्या वाढवण्यात येणार आहे. दीड महिन्यात जिल्ह्यात उपलब्ध सर्व सरकारी व खासगी बेड ऑक्सिजन करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यासाठी रोज १३ केएल ऑक्सिजनची गरज असून ती दुपटीने म्हणजे २६ केएल उपलब्धता केली आहे.

ऑक्सिजनच्या साठेबाजी होणार नाही, यावर लक्ष ठेवण्यात येत आहे. ऑक्सिजनच्या उपलब्धतेसाठी डॅशबोर्ड तयार करण्यात येणार असून त्याचे जिल्हा शल्यचिकित्सक नोडल अधिकारी आहेत. यंत्रणेने ऑक्सिजन वापराचेही ऑडिट करावे तर काळाजी गरज म्हणून खासगी रूग्णालयांनी हवेतून उपलब्ध होणाऱ्या ऑक्सीजने प्लांट निर्माण करावेत, अशी सूचनाही श्री. देशमुख यांनी या वेळी केली.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Medical Post Graduate Examination Result Will Declare Soon