वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया : मराठा समाजातील विद्यार्थी संभ्रमात, कोणत्या संवर्गातून अर्ज करावा?

हरि तुगावकर
Thursday, 12 November 2020

वैद्यकीय प्रवेशासाठी राज्यातील शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशप्रक्रियेसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस गुरुवार (ता.१२) आहे.

लातूर : वैद्यकीय प्रवेशासाठी राज्यातील शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशप्रक्रियेसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस गुरुवार (ता.१२) आहे. त्यामुळे कोणत्या संवर्गातून प्रवेश अर्ज करावा अशा संभ्रमावस्थेत अनेक विद्यार्थी आहेत. काही विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र दिल्याने या संवर्गातून अर्ज केला आहे. तर अनेकांना असे प्रमाणपत्र देण्यात न आल्याने त्यांनी शेवटी खुल्या प्रवर्गातून अर्ज केला आहे. शासनाकडून व्यवस्थित मार्गदर्शन होत नसल्याने विद्यार्थी संभ्रमात आहेत.

अतिवृष्टीग्रस्तांच्या खात्यात दोन दिवसांत रक्कम जमा होईल - राज्यमंत्री बच्चू कडू

सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यात गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. गुरुवारी प्रवेश अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएसचे प्रमाणपत्र देऊ नये असे शासनाचे आदेश असल्याने अनेक तहसीलदारांनी असे प्रमाणपत्र देण्यास विद्यार्थ्यांना नकार दिला आहे. तर काही तहसीलदारांनी मात्र असे प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे प्रमाणपत्र मिळणाऱ्या विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यूएसमधून अर्ज दाखल केले आहेत.

पडताळणीत ते वैध धरले जाणार की अवैध याबाबतही विद्यार्थ्यांत संभ्रम आहे. गेल्या वर्षीपर्यंत अर्ज दाखल केल्यानंतर स्टेट मेरिट, व्हेरिफिकेशन, फायनल लिस्ट असा क्रम होता. त्यामुळे अर्जाची तातडीने पडताळणी होत होती; पण यावर्षी त्यात बदल करण्यात आला आहे. महाविद्यालयात गेल्यानंतरच त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. तेथे अवैध ठरवले गेले तर विद्यार्थ्यांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागणार आहे.

आपले काय चुकले हे आधी पाहा, खासदार इम्तियाज जलील यांचा काँग्रेसला टोला

 

राज्यात ज्या वेळेस मराठा समाजाला आरक्षण होते त्या वेळेस शासनाने या समाजातील विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएसचे प्रमाणपत्र देऊ नये असे आदेश काढले होते; पण आता आरक्षणाला न्यायालयाची स्थगिती आहे. त्यामुळे या समाजातील विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएसचे प्रमाणपत्र मिळाले पाहिजे, अशी आमची मागणी आहे.
ईश्वर गावंडे, पालक.

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Medical Students Of Maratha Community Not Clear How To Fill Form