अतिवृष्टीग्रस्तांच्या खात्यात दोन दिवसांत रक्कम जमा होईल - राज्यमंत्री बच्चू कडू

प्रकाश बनकर
Thursday, 12 November 2020

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारने मदत घोषित केली आहे. यातील ५० टक्के रक्कम विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून जिल्‍हाधिकाऱ्यांकडे जमा केली आहे.

औरंगाबाद : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारने मदत घोषित केली आहे. यातील ५० टक्के रक्कम विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून जिल्‍हाधिकाऱ्यांकडे जमा केली आहे. ही पन्नास टक्के रक्कम येत्या दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, असे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी औरंगाबादेत आज माध्यमांशी बोलताना सांगितले.प्रहार जनशक्ती पक्षातर्फे बुधवारी (ता.११) मसापच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात मेळावा घेण्यात आला.

आपले काय चुकले हे आधी पाहा, खासदार इम्तियाज जलील यांचा काँग्रेसला टोला

या मेळाव्यास तसेच पक्षातर्फे मराठवाडा पदवीधर मतदारसंघातर्फे निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कार्यक्रमासाठी राज्यमंत्री कडू औरंगाबादेत आले होते. राज्यमंत्री कडू म्हणाले, की मराठवाड्यासह राज्याच्या विविध अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पहिल्या हप्त्यापोटी दोन हजार २९७ कोटी सहा लाख ३७ हजार रुपयांचा निधी वितरित करण्याचा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यानुसार ही रक्कम येत्या दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल. आतापर्यंत १८६ कोटी रुपये जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा झाले आहेत. हा पहिला हप्ता आहे, त्यानंतर लागलीच दुसरा हप्ताही दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

‘प्रहार’तर्फे सचिन ढवळे पदवीधरच्या निवडणुकीत
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षातर्फे सचिन ढवळे यांची उमेदवारी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी जाहीर केली. या मतदारसंघात आम्ही पूर्वीपासून तयारी केलेली आहे. यात रोजगार ते महापोर्टलपर्यंतचे प्रश्‍न ढवळे यांनी सातत्याने मांडले आहेत. यासह ५० ते ६० हजार सदस्यांची नोंदणीही केली. आम्ही आजही महाविकास आघाडीसोबत आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवारासंदर्भात चर्चा झालेली नाही. लढत कोणासोबत होईल हे सांगता येणार नाही. मात्र, मुख्यमंत्री ठाकरे यांचा शब्द अंतिम राहणार आहे. अडचण आली नाही, तर आम्ही नक्की निवडणूक जिंकू, असेही बच्चू कडू यांनी सांगितले.

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Within Two Days Heavy Rain Hit Farmers Get Money In Their Accounts