तंत्रज्ञान युगातही समाजाची मानसिकता जुनीच

File photo
File photo

नांदेड : वैद्यकिय क्षेत्रामध्ये नवनवीन तंत्रज्ञान जन्माला येत असल्याने, गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, तपासण्या करणे सहज सुलभ झाले आहेत. मात्र, हे तंत्रज्ञान समाजापर्यंत अद्याप पोचले जात नसल्याने समाजाची मानसिकता शंभर वर्षांपूर्वीचीच असल्याचे दिसून येत आहे. मुंबई, पुणे, औरंगाबादप्रमाणेच नांदेडमध्येही अवयवदानाची यशस्वी प्रक्रिया पार पाडली जात आहे. काही अंशीप्रमाणात समाजाची मानसिकता होत असली, तरी अजूनही रक्तदानाप्रमाणेच अवयवदानाबाबतही जनजागृतीची गरज आहे.

अवयवदान ही संकल्पना अलीकडची म्हणजे २० ते २५ वर्षांपूर्वीची आहे. आज वैद्यकीय तंत्रज्ञान अत्यंक प्रगत झालेले आहे. रुग्ण जेव्हा ब्रेन डेड होतो, तेव्हा त्याचे बाकीचे अवयव कार्यरत असतात. कोमामधील रुग्ण आणि ब्रेन डेड झालेला रुग्ण यामध्ये खूप फरक आहे. कोमामधील रुग्ण चांगला होऊ शकतो. पण ब्रेन डेड झालेला रुग्ण हा कधीही बरा होऊ शकत नाही. या गोष्टीचा वैद्यकीय क्षेत्रात जेव्हा शोध लागला, तेव्हा ब्रेन डेड झालेल्या रुग्णाचे अवयव दुसऱ्या रुग्णाचे जीव वाचवू शकतात, हे तंत्रज्ञान जन्माला आले आहे. 

जिवंत व्यक्ती अवयव दान करू शकते काय?
कायद्यानुसार जिवंत व्यक्ती फक्त आपल्या जवळच्या नात्यातील व्यक्तीलाच (आई-वडिल, मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण) अवयवदान करु शकते. त्रयस्थ व्यक्तीला फक्त ब्रेन डेड झालेले रुग्णच अवयवदान करू शकतात. इथे नात्याची आवश्यकता नाही. एखाद्या रुग्णाच्या मेंदूला मार लागला किंवा अन्य काही कारणामुळे इजा झाली तर तो रुग्ण ब्रेन डेड झाला, हे सर्व तज्ज्ञ डाॅक्टरची टिम ठरवत असते. यामध्ये सरकारने मान्यता दिलेल्या चार डाॅक्टरची टिम असते. ब्रेन डेड घोषित करण्यापूर्वी सहा तासांत दोन वेळा अशा रुग्णाची तपासणी केली जाते. मगच हा रुग्ण आता जिवंत होऊ शकत नाही, असे निदान झाल्यावरच त्या रुग्णाला ब्रेन डेड घोषित केले जाते. नातेवाइकांना तसे प्रमाणपत्रही दिले जाते. या रुग्णाचे मेंदू जरी मृत होत असला तरी, हृदय, यकृत, मूत्रपिंड अशा अवयवाचे कार्य सुरुच असते.

अशी असते प्रक्रिया
अवयवदानाच्या चळवळीत झोनल ट्रान्सप्लांट को आॅर्डीनेशन कमिटीची (झेडटीसीसी) भूमिका महत्त्वाची असते. अवयव दात्याची माहिती झेडटीसीसीला दिल्यानंतर त्या रुग्णाचे अवयव कुठे पाठवायचे याची माहिती दिली जाते. त्यानुसार अवयव प्रत्यारोपणाची प्रक्रिया पार पाडली जाते. यामध्ये अवयव दान घेणाऱ्या रुग्णाची निकड पाहिली जाते. जातपात, गरीब-श्रीमंत असा भेदभाव केला जात नाही. यामध्ये अवयव दात्याचे हृदय चार तासाच्या आत, यकृत सहा तासाचे आत, मूत्रपिंड आठ तासांचे आत प्रत्यारोपित करणे आवश्यक आहे. हे अवयव त्याला कमी तापमानामध्ये आणि जास्तीत जास्त वेळ इजा न होता राहू शकेल अशा व्यवस्थेमध्ये प्रत्यारोपण ज्या रुग्णालयात करायचे आहे तेथे नेले जाते. अशा वेळी वेळ वाया जाऊ नये यासाठी रस्ता रहदारीस बंद (ग्रीन काॅरिडाॅर) केला जातो.

मानसिकता बदलणे गरजेचे
वैद्यकीय तंत्रज्ञान हे वेगाने पुढे जात आहे. पण समाजमनाची मानसिकता अजूनही शंभर वर्षांपूर्वीचीच बघायला मिळत आहे. समाजमनाची मानसिकता आणि तंत्रज्ञान यांच्यातील तफावत भरून काढण्याची आवश्यकता आहे. ही तफावत दूर करण्यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे.  
- डॉ. श्रीरंगराव कुलकर्णी (निवृत्त)  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com