पेरुने दिला ‘या’ शेतकऱ्याला बक्कळ पैसा ! 

file photo
file photo

झरी (जि.परभणी) : शासनाचे कुठलेही अनुदान न घेता एक एकर पेरू लागवडीपासून ते सात एकरवर पेरू लागवड करत झरी (ता.परभणी) येथील शेतकरी ज्ञानेश्वर आश्रोबा करंजकर यांनी लाखो रुपयांचे उत्पन्न घेत अन्य शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
शेतकरी करंजकर यांना झरी शिवारात वडिलोपार्जित नऊ एकर शेती असून एक बोरवेल व बोरवेल शेजारी एक पाझर शेततळे आहे. याआधी ते पारंपारिक पिके घेत होते. परंतु, त्यातून फारकाही उत्पन्न मिळत नसल्याने त्यांनी फळबागेकडे लक्ष दिले. सध्या त्यांच्याकडे सातर एकरवर पेरुची बाग आहे. २००७ मध्ये शेतकरी करंजकर हे बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी फळवाटीका विभागात कार्यरत असलेले झरीचे भुमीपुत्र नामदेव कलाने यांनी करंजकर यांना पेरू बागेबद्दल मार्गदर्शन केले. याठिकाणी प्रेरणा मिळाल्याचे करजंकर सांगतात. एक एकरवर पेरू लागवडीसाठी ५० रुपये प्रति रोप या प्रमाणे रोपांचे ४८ हजार रुपये व ठिबक सिंचनसाठी ३० हजार रुपये व अन्य खर्च १० हजार रुपये, असा एकूण ८८ हजार रुपये लागणार होते. एवढे पैसे आणायचे कोठून त्यांच्या समोर एक मोठे आव्हान होते.

हेही वाचा - त्याने तिला टहाळ खायला बोलावले अन्...

पत्नी, आईचे सोने मोडले
शेतकरी ज्ञानेश्वर करंजकर यांनी पत्नीच्या कानातील सोन्याचे फुलं व आईच्या गळ्यातील एकदाणी मोडली आणि पैशाची जमवाजमव केली. उर्वरीत रक्कम त्यांनी ट्रॅक्टर एजन्सीवर काम करून जमा केली आणि एक एकरवर ललित या वानाची २००७ मध्ये दहा बाय पाच या अंतरावर ९६० रोपांची लागवड केली. दोन वर्षात झाडांची जोमात वाढ होऊन फळधारणेस सुरवात झाली. जवळपास एक एकरमधून २ लाख ५० हजार रुपयांचे पेरू बाजारात विकले. त्यांनी तो सर्व पेरू रस्त्यावर स्टॉल लावून विकले. ४० रुपये ते ५० रुपये प्रति किलो दराने विक्री केले. पेरू विक्री केलेल्या आलेल्या पैशातून आई व पत्नीचे दागिने परत करून दिल्याचे ते सांगतात.

दुसऱ्या वेळी स्वत: तयार केल्या कलमा
दुसऱ्या वेळेस २०१० मध्ये त्यांनी ऑगस्ट महिन्यामध्ये तीस झाडावर स्वतः कलमा तयार केल्या आणि त्या पेरू स्टॉलवर विक्री केल्या. विकलेल्या कलमांच्या पैशातून दुसऱ्या जातीच्या पेरू कलमांची रोपे आणून त्यांनी अशा एकूण सात वाणांची लागवड केली आहे. रत्नदीप, ललित, व्ही. एन.आर.थाई, सेवनअर्का, किरण, सरदार,अलाहाबाद सफेदा इतक्या जातीचे पेरू त्यांनी लागवड केली आहे. त्यापैकी ललित व अर्का किरण या दोन जातीचे उत्पन्न सुरू झाले असून यंदा त्यांनी नांदेडच्या व्यापाऱ्यास तीन लाख रुपयांना बाग दिली आहे. रत्नदीप या जातीच्या त्यांनी कलमा तयार करून ते स्वत:विक्री करीत आहेत.


जमिनीनुसार फळबाग लागवड करावी
शेतकऱ्यांनी शेततळे किंवा पाझर शेततळे विहिरीजवळ किंवा बोरवेल शेजारी अवश्य घ्यावे. जमिनी नुसार एक किंवा दोन एकरवर फळबाग लागवड करावी. त्यामध्ये पेरू, सिताफळ, लिंबूनी, चिकू, अंजीर, जांभूळ, कश्मीरी एप्पल बोर आदींची लागवड करावी.
ज्ञानेश्वर करंजकर, पेरु उत्पादक शेतकरी
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com