अंत्यसंस्कार करताना कळाले मृतदेह नातेवाइकाचा नाही, पुन्हा गाठवे लागले रुग्णालय

दत्ता देशमुख
Monday, 12 October 2020

अंत्यसंस्काराची तयारी पूर्ण करून शेवटचा विधी करताना मृतदेहाच्या अंगावरची किट काढल्यानंतर हा मृतदेह आपल्या नातेवाइकाचा नसल्याचे समोर आले.

बीड : अंत्यसंस्काराची तयारी पूर्ण करून शेवटचा विधी करताना मृतदेहाच्या अंगावरची किट काढल्यानंतर हा मृतदेह आपल्या नातेवाइकाचा नसल्याचे समोर आले. अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या (स्वाराती) ढिसाळ कारभारामुळे पुन्हा एकदा शोकाकूल नातेवाइकांना मृतदेह आणण्यासाठी अंबाजोगाई गाठावे लागले.बीड शहरातील मोमीनपुरा भागातील ३२ वर्षीय तरुणाला ताप आल्याने त्याला उपचारासाठी अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.

या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्या तपासणी अहवालात त्याला निमोनिया असल्याचे निदान झाले होते. मृत्यूनंतर त्याचा मृतदेह रुग्णालयातील शवगृहातील फ्रिजरमध्ये ठेवण्यात आला. याच दरम्यान परळी तालुक्यातील अन्य एकाचा मृतदेहही फ्रिजरमध्ये होता. शनिवारी रात्री मृताच्या नातेवाइकांना रुग्णालय प्रशासनाने मृतदेह ताब्यात दिला.

निलेश राणे यांच्यासह दोघांविरोधात बीड जिल्ह्यात गुन्हा दाखल

मृतदेह किटमध्ये बंद होता. अंत्यसंस्कार करण्याच्या वेळी चेहऱ्यावरची किट काढल्यानंतर हा मृतदेह आपल्या नातेवाइकाचा नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह पुन्हा अंबाजोगाई रुग्णालयात पाठविला आणि त्याठिकाणाहून नातेवाइकाचा मृतदेह आणला. ज्या वेळी मृतदेह नातेवाइकांकडे सोपविण्यात आला त्यावेळी फ्रिजर रूममधील विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले. मात्र, तरुणाच्या मृत्यूमुळे शोकाकूल कुटुंबाला असा मन:स्ताप सहन करण्याची वेळ या ढिसाळपणामुळे आली.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mistakely Hand Over Other Dead Body To Relatives Beed News