दोनशे कुटुंबांना जीवनावश्‍यक वस्तूंच्या किटचे वाटप, आमदार अभिमन्यू पवार यांचा पुढाकार

जलील पठाण
बुधवार, 1 एप्रिल 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात टाळेबंदीमुळे अनेकांचा रोजगार हातून गेला आहे, अशा परिस्थितीत आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडून औसा विधानसभा मतदारसंघातील २०० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट औसा व निलंगा तहसील कार्यालयात देण्यात आले आहेत; तसेच मतदारसंघातील तीन ग्रामीण रुग्णालयांत ३० लाखांचे चार व्हेंटिलेटर व बायपॅप यंत्र आमदार निधीतून दिले जाणार आहे.

औसा (जि.लातूर) ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात टाळेबंदीमुळे अनेकांचा रोजगार हातून गेला आहे, अशा परिस्थितीत आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडून औसा विधानसभा मतदारसंघातील २०० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट औसा व निलंगा तहसील कार्यालयात देण्यात आले आहेत; तसेच मतदारसंघातील तीन ग्रामीण रुग्णालयांत ३० लाखांचे चार व्हेंटिलेटर व बायपॅप यंत्र आमदार निधीतून दिले जाणार आहे.

कोरोनामुळे देशातील लोकांना टाळेबंदीला सामोरे जावे लागत आहे. या परिस्थितीत काही दानशूर लोकांकडून मदतीचे हात पुढे येत आहेत. यासाठी लोकांनी पंतप्रधान मदतनिधी व मुख्यमंत्री सहायता निधीत सढळ हाताने मदत करावी. अनेक कुटुंबांचा रोजगार गेला आहे. त्यांची उपासमार होऊ नये यासाठी प्रत्येकाने आपल्या पद्धतीने लोकांना खाण्यापिण्याची सोय करावी, असे आवाहन श्री. पवार यांनी केले आहे. त्यांनी औसा विधानसभा मतदारसंघात २०० जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप केले आहेत. एका किटमध्ये १० किलो गव्हाचे पीठ, पाच किलो तांदूळ, दोन किलो तूरडाळ, एक किलो गोडेतेल, एक किलो मीठ, २५० ग्रॅम मिरची पावडर, जिरे- मोहरी ५० ग्रॅमचे पाकीट व दोन डेटॉल साबणांचा समावेश आहे. १५० किट औसा तहसीलदार व ५० किट औसा विधानसभा मतदारसंघातील निलंगा तालुक्यात येणाऱ्या गावांसाठी निलंगा तहसीलदार यांच्याकडे देण्यात आले आहेत; तसेच मतदारसंघातील काही कुटुंबे मोलमजुरीसाठी तासगाव, तेलंगणा, शिरूर, लोणावळा व अन्य भागात त्या ठिकाणी प्रशासनाच्या मदतीने खाण्यापिण्याची सोय आमदार अभिमन्यू पवार यांनी केली आहे. कोरोनाबाबत प्रशासनाकडून काय खबरदारी घेतली जात आहे.

हेही वाचा ः  गरज पडल्यास लातुरात लष्करालाही पाचारण करणार, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

यासाठी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलिस प्रशासन यांच्याशी सतत संपर्क ठेवून याचा आढावा श्री. पवार घेत आहेत. मतदारसंघातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी घेतली जात असून, मतदारसंघातील तीन ग्रामीण रुग्णालयांत चार व्हेंटिलेटर आमदार निधीतून देण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आले आहेत. यामध्ये औसा रुग्णालयात दोन, कासारशिरसी एक, किल्लारी एक असे चार व व बायपॅप यंत्राची व्यवस्था केली जाणार आहे. यासाठी ३० लाखांचा निधी लागणार आहे. मतदारसंघातील तहसील कार्यालय, उपविभागीय पोलिस अधिकारी, ग्रामीण व प्राथमिक आरोग्य केंद्रात सुमारे एक हजार मास्क वाटप केले गेले आहेत. यासह मतदारसंघातील अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करीत असताना नागरिकांनी शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन श्री. पवार यांनी केले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Abhimanyu Pawar Distribute Food Kits, Ausa