शेती हे शेतकऱ्यांचे हृदय तर शेतरस्ते रक्तवाहिन्या

जलील पठाण
Friday, 29 January 2021

यावेळी आमदार श्री. पवारांनी सांगितले की, नवनिर्वाचित सदस्यांनी गावाचा विकास करावा, मला मतदारसंघाचा विकास करायचा आहे.

औसा (लातूर) : औसा मतदारसंघातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामविकासाच्या आराखड्यात शेतरस्त्यांना प्रथम स्थान दिले पाहिजे. कारण ग्रामीण भागाच्या विकासाचा कणा हे शेतीतून मिळणारे उत्पन्न आहे आणि हे उत्पन्न जर वाढवायचे असेल तर प्रत्येक शेताला रस्ता मिळायला हवा. जर शेती हे शेतकऱ्यांचे हृदय असेल तर शेतरस्ते ह्या त्याच्या रक्तवाहिन्या आहेत. माझा संपूर्ण आमदार निधी हा क्षेत्रास्त्यासाठी उपयोगात आणणार असून नकाशावर असलेले सर्व शेतरस्ते येणाऱ्या एक ते दोन वर्षात मोकळे होतील. लोकप्रतिनिधी म्हणून मी माझे काम करतोय. आता शेतरस्ते मोकळे करण्याचे काम जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांनी वेळेत करावे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई- सकाळचे ऍप 

शेतरस्त्याच्या तंट्यात मी शासनाच्या कोठेही आडवे येणार नाही व तशी तक्रार कोणी माझ्याकडे करू नये, अशी विनंती करतानाच प्रत्येक गाव स्वयंपूर्ण आणि आर्थिक उन्नतीवर असलेले स्वप्न मी पहात असल्याचे प्रतिपादन औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी केले. औसा मतदारसंघातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार कार्यक्रम व आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटलांच्या क्रिएटिव्ह फाऊंडेशन  आयोजित कार्यशाळेत ते गुरुवारी (ता.२८) बोलत होते. 

प्रेरणादायी:  दोन एकरमधील केळीच्या लागवडीतून कमावले चौप्पट उत्पन्न

यावेळी आमदार श्री. पवारांनी सांगितले की, नवनिर्वाचित सदस्यांनी गावाचा विकास करावा, मला मतदारसंघाचा विकास करायचा आहे. विकासासाठी आपण राजकीय मतभेद आणि पक्षीय झुल उतरून टाकू. एकमेकांच्या सहकार्याने काम करू. ग्रामपंचायतींनी विकास आराखडे तयार करावेत, तो मंजूर होणारच. जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागाने रस्ते मोकळे करून घ्यावेत. आम्ही लागलीच त्याच्या मजबुतीकरणाची प्रक्रिया सुरू करू. ग्रामीण भागातील महिलांनी आता गृहउद्योग सुरू केले पाहिजेत. सामूहिक पद्धतीने अनेक रोजगाराचे मार्ग असल्याने आर्थिक उलाढालीत महिलांना पण भागीदार होता येईल. सरपंच हौशी आणि गावाचं डोकं ठिकान्यावर असावं. 

यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना मार्गदर्शन करताना आदर्श सरपंच भास्करराव पेरे म्हणाले, की गावाचा विकास करण्याचा ध्यास सरपंचात असावा आणि त्याला साथ देण्यासाठी ग्रामस्थांचे डोके शांत असायला हवे. गावाच्या विकासासाठी सरपंच नवीन कायदे करू शकतो. फक्त त्यामध्ये खाजगी स्वार्थ नको. ग्रामसभेने जर चांगले निर्णय घेतले तर तुमचेही गाव पाटोदाहून चांगले आणि विकसित बनू शकते. गावाचे सरपंच आणि सदस्य हे त्या गावाचे विठ्ठल रुक्मिणी असतात तर गाव त्यांचे पंढरपूर. विरोधकाकडे लक्ष देण्यापेक्षा गावाच्या विकासासाठी झटले तर गावाचा काया पालट नक्की होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

यावेळी भाजपचे जेष्ठ सुशील वाजपेयी, ऍड मुक्तेश्वर वागदरे, तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, पालिकेचे गटनेते सुनील उटगे, संतोष मुक्ता, काकासाहेब मोरे, दीपक चाबुकस्वार, सुहास पाचपुते यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Abhimanyu Pawar guides newly elected Gram Panchayat members that agriculture is the heart of farmers and roads are blood vessels