आमदार सावेंना काय म्हणाले होते मुख्यंमत्री (वाचा सविस्तर खुलासा)

सुषेन जाधव
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

  • आठ दिवसापूर्वीच म्हणाले होते "काळजी करु नका, सरकार आपलंच येणार' 
  • आमदार अतुल सावे यांनी केला मोठा खुलासा

औरंगाबाद :  मुख्यमंत्र्यांना आठ दिवसापूर्वीच भेटलो होतो, तेव्हा ते काळजी करु नका असे म्हटले होते, असा मोठा खुलासा औरंगाबादेतील भाजपाचे आमदार अतुल सावे यांनी केला आहे. "तुम्ही विश्‍वास ठेवा, काळजी करु नका, सरकार आपलंच येणार आहे, आणि मी पुन्हा मुख्यमंत्री होणार आहे' असेही मुख्यमंत्री आठ दिवसापूर्वीच त्यांना भेटायला गेल्यानंतर म्हटले होते असे श्री. सावे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना वक्‍तव्य केले आहे. राजकीय वर्तूळात भुकंप झाला म्हणजे नेमकं काय झालं यावर बोलताना आमदार सावे यांनी विविध खुलासे केले आहेत. 

आमदार सावे म्हणाले की, महाराष्ट्राच्या जनतेची कामे मागील पाच वर्षापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस यांच्या नेतृत्वाखाली झाली होती. संपूर्ण राज्याची प्रगती, विकास झाल्यानेच जनतेने मुख्यमंत्र्यांच्या बाजूने कौला दिला होता, पून्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावे ही जनतेची इच्छा होती, त्याचाच कौल म्हणून फडवणीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे, असेही आमदार सावे म्हणाले. 

मी पुन्हा मुख्यमंत्री होणार आहे
उद्या सकाळी म्हणजेच शनिवारी (ता.23) सकाळी सकाळी मुख्यमंत्री पदाचा शपथविधी होणार असल्याची माहिती तुम्हाला होती का ? या पत्रकारांच्या प्रश्‍नावर आमदार सावे म्हणाले की, आम्ही भाजपचे काहीजण साधारण आठ दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो होतो, त्याचवेळी श्री. फडणवीस यांनी सांगितले होते की, "तुम्ही विश्‍वास ठेवा, काळजी करु नका, सरकार आपलंच येणार आहे, आणि मी पुन्हा मुख्यमंत्री होणार आहे' आज मुख्यमंत्र्यांनी जे बोलतात ते करतातच हे दाखविले आहे. त्यांनी महाराष्ट्राचा विकास करण्याची जी शपथ घेतली आहे, ती नक्कीच त्यांच्याकडून महाराष्ट्राला ते एक दिवस शिखरावर नेऊन पोहोचविणार आहेत. 

फडणवीसांवर आम्हाला विश्‍वास

पत्रकारांच्या "तुम्ही उद्योगमंत्री होतात, शिवसेना तुमच्यासोबत होती, आता शिवसेना सोडून राष्ट्रवादी सोबत आहे' या प्रश्‍नावर श्री. सावे म्हणाले की, "आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहोत, आणि त्यांच्या नेतृत्वावर आम्हाला विश्‍वास आहे. ते राज्याच्या विकासासाठी जे बरोबर असतील त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्राचा विकास करतील. 

मला खात्री आहे, महाराष्ट्रात मागील पाच वर्षात जसा विकास झाला तसाच विकास करुन मुख्यमंत्री महाराष्ट्राला येत्या पाच वर्षात प्रगतीच्या शिखराला पोहोचवतील. मुख्यमंत्री फडवणीस यांना खुप शुभेच्छा. 
- आमदार अतुल सावे, भाजपा. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Atul save saying CM is become CM before 8 days