
उजनी ते खुंटेफळ पाणीयोजनेत सुरेश धस यांचा खोडा
आष्टी (जि.बीड) : उजनी ते खुंटेफळ या पाणी योजनेमुळे तालुक्यातील जवळपास 70 गावांचा पाणीप्रश्न मार्गी लागणार आहे. मात्र, योजनेस स्थगिती द्यावी, असे पत्र विधान परिषदेचे सदस्य आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्याने या योजनेला स्थगिती मिळाली आहे. आष्टी तालुक्यातील या महत्वाकांक्षी खोडा घालण्याचे काम धसांनी केले आहे, असा आरोप आमदार बाळासाहेब आजबे यांनी आज (ता. 17) शिराळ येथे निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत केला.
आमदार आजबे म्हणाले, की उजनी ते खुंटेफळ उपसा सिंचन योजनेतील थेट पाईपलाईनद्वारे खुटेफळ तलावात पाणी टाकण्यासाठी माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी १ हजार ४६८ कोटी रुपयांच्या कामास मंजुरी दिली आहे. आष्टी तालुक्याला मिळालेल्या हक्काच्या 5.68 टीएमसी पाण्यापैकी 1.68 टीएमसी पाणी या योजनेद्वारे तालुक्याला मिळणार आहे. तालुक्याचा पाणीप्रश्न मिटावा यासाठी आमदारकी मिळाल्यानंतर लगेचच मी या योजनेस मंजुरी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सततच्या पाठपुराव्यामुळे एसएलटीसीची परवानगीही अवघ्या दोन महिन्यात प्राप्त झाली.
पाणी उपलब्धता नसलेल्या ठिकाणी केवळ आर्थिक गैरप्रकार करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या जुन्या योजनेमध्ये बदल करून मी खात्रीलायक पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणाहून थेट उजनी धरणाचे बॅक वाॅटरचे पाणी या योजनेद्वारे खुंटेफळ साठवण तलावात पाईपलाईनद्वारे आणण्यात येणार आहे.
वास्तविक, सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या असलेल्या या प्रश्नावर तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येण्याची गरज आहे. 1.68 टीएमसी पाणी मिळाल्यानंतर उर्वरित चार टीएमसी पाणी मिळविण्यासाठीही माझे प्रयत्न सुरू होते, महाविकास आघाडीचे सरकार राहिले असते तर ते पाणीही लवकरच तालुक्याला मिळून तालुका सुजलाम सुफलाम झाला असता. मात्र, यासाठी माजी आमदार भीमराव धोंडे व साहेबराव दरेकर हे यासाठी सहकार्य करीत असताना आमदार सुरेश धस मात्र, यामध्ये खोडा घालण्याचे काम करीत आहेत.
उजनी ते खुंटेफळ या 1 हजार 468 कोटींच्या पाणी योजनेबरोबरच आष्टी मतदारसंघात 65 कोटींची जलसंधारण कामे, आष्टी, पाटोदा व शिरूर या तीनही नगरपंचायतींना प्रत्येकी प्राप्त झालेल्या दीड कोटी अशा एकूण 5 कोटींच्या कामे याचबरोबर कडा येथील बसस्थानकाच्या कामालाही आमदार धसांनीच स्थगिती दिल्याचा आरोप करून खुंटेफळ येथील शेतकर्यांनी या योजनेसाठी जमिनी देऊ नयेत, असे प्रयत्नही धस करीत असल्याचेही श्री. आजबे म्हणाले. योजनेला तात्पुरती स्थगिती द्यावी असे आमदार धस यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेले पत्रही आजबेंनी पत्रकार परिषदेत दाखविले.
धसांचा आणखी एक जमीन घोटाळा
दरम्यान, आमदार सुरेश धस यांनी देवस्थान जमिनी कार्यकर्त्यांच्या नावे घेऊन त्या बळकाविण्याचा प्रकार नुकताच घडलेला आहे. खुंटेफळ येथील साठवण तलावामुळे निर्वासित होणार्या लोकांचे पुनर्वसनासाठी जे ठिकाण निश्चित करण्यात आले आहे. या ठिकाणीही आमदार धस यांनी जमीन घोटाळा केला असून त्यांच्या मर्जीतील लोकांच्या नावे जमिनी खरेदी करून आणखी एक घोटाळा केला असल्याचा आरोपही आमदार आजबे यांनी केला.
धस तालुक्याच्या विकासाला लागलेली कीड
कामाचे श्रेय घ्यायचे तर तुम्ही घ्या परंतु विकासकामांत खोडा घालण्याचे काम कोणी करणे योग्य नाही. धसांच्या काळात झालेल्या कामांमधील भ्रष्टाचार जनतेने पाहिला आहे. देवस्थानच्या जमिनीही यांनी कार्यकर्त्यांच्या नावावर घेतल्याचे पुरावेही सगळीकडे मिळाले आहेत. धसांच्या 15 वर्षांच्या काळात केवळ जळगाव येथील तलावाचे काम करण्यात आले असून तलावात कमरेएवढे पाणीही साठले नाही. शेतकर्यांच्या प्रश्नांवर राजकारण करून आमदार धस जर विकासकामांना स्थगिती आणत असतील तर ती मतदारसंघाला लागलेली कीड आहे, असे म्हणावे लागेल, असा घणाघातही आमदार आजबे यांनी केला.
Web Title: Mla Balasaheb Ajbes Allegation Against Suresh Dhas
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..