‘तूर’ प्रकरणी आमदार पवार यांनी घेतली दखल

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 April 2020

नायगाव तालुक्यातील काही शेतकऱ्यांना आॅनलाइन नावनोंदणीप्रमाणे तूर खरेदी केंद्राचा मोबाइलवर गुरुवारी (ता. १६ ) तूर घेऊन येण्याचा मेसेज मिळाला. त्यानुसार बरेच शेतकरी तूर विक्रीसाठी खरेदी केंद्रावर घेऊन गेले. मात्र, या ठिकाणी तूर चांगली असतांनाही अनेकांची तूर घेण्यास नकार दिला.

नांदेड : नायगाव येथील हमी भाव तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक ‘सकाळ’ने शुक्रवारी (ता. १६) प्रशासनाच्या निदर्शनात आणून दिली. या बातमीची दखल आमदार राजेश पवार यांनी घेतली आहे. त्यांनी नायगाव येथील तूर खरेदी केंद्राच्या संबंधितांशी याविषयी चर्चा केल्याचे त्यांनी ‘सकाळ’शी सांगितले. त्यामुळे खरेदी केंद्रावर तूर विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या तुरीला विनाकारण नाव ठेवून तूर खासकी व्यापाऱ्यांनाच विकण्यास भाग पाडणाऱ्यांवर योग्य ती कारवाई होइल, अशी आशा व्यक्त होत आहे. 

हेही वाचा..... लॉकडाऊन : चक्क नवरीलाच नवरदेवाने आणले दुचाकीवरून घरी

तूर घेण्यास दिला नकार
नायगाव तालुक्यातील काही शेतकऱ्यांना आॅनलाइन नावनोंदणीप्रमाणे तूर खरेदी केंद्राचा मोबाइलवर गुरुवारी (ता. १६ ) तूर घेऊन येण्याचा मेसेज मिळाला. त्यानुसार बरेच शेतकरी तूर विक्रीसाठी खरेदी केंद्रावर घेऊन गेले. मात्र, या ठिकाणी तूर चांगली असतांनाही अनेकांची तूर घेण्यास नकार दिला. काहींनातर चक्क तुरीचे, वजन करून, जमिनीवर मोकळी टाकून पुन्हा नाव ठेवत शेतकऱ्यांना ते भरून नेण्यास भाग पाडले. अनेकांनी विनवनीही केली. मात्र, तेथील जबाबदार केंद्रचालकाने ‘वाट्टेल ते करा, तूर घेणारच नाही’, असे म्हणत शेतकऱ्यांशीच हुज्जत घातली.  ही सर्व माहिती या शेतकऱ्यांपैकीच नारायण पाटील कहाळेकर यांनी ‘सकाळ’ला कळविली. शुक्रवारच्या (ता. १७) सकाळ डिजिटलच्या अंकात ही बातमी प्रकाशीत करण्यात आली.

हेही वाचलेच पाहिजे..... .....तर शेतकऱ्यांचे नुकसान टळेल....कोण म्हणाले ते वाचा

आमदार राजेश पवार यांच्याकडून दखल
या बातमीची दखल नायगाव मतदारसंघाचे आमदार राजेश पवार यांनी घेतली. नायगाव बाजार समितीचे सचिव कदम यांचेशी बोललो असता, कदम यांनी ‘‘कमी दर्जाची (BELOW  FAQ GRADE) तूर आम्हाला घेता येत नाही,’’ असे सांगितल्याचे राजेश पवार म्हणाले. शेतमाल हा मातीत पिकतो, तो कुण्या कंपनीचे प्रॉडक्ट नाही. त्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे या उत्पादनांचा थोडाफार दर्जा कमी होतो. मात्र, शासकीय यंत्रनेने या मालास नाव ठेवून तो माल खरेदी करणारच नाही, असे सांगत असतील तर यांनी शेतकऱ्यांकडून शंभर टक्के चांगल्या दर्जाचा माल मिळण्याची आशा सेडावी व हे खरेदी केंद्र बंद करून शेतकऱ्यांसाठी सेवा देत असल्याचे ढोंग थांबवावे. त्याने निदान शेतकऱ्यांचे विनाकारण या केंद्राच्या आशेने होणारे आर्थिक नुकसान तरी टळेल. 

शेतकऱ्यांनी माल ग्रेडिंग करुन आणावा
किमान हमी दरानुसार शेतीमाल खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांचा माल ग्रेडिंग करुन आणावा. यात आरकल, काडी, कचरा बाजूला काढून आणला तर तो घेतला जातो. असा शेतमाल परत केला जात नाही.
- संजय कदम
सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, नायगाव.
    


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Pawar has taken note of the 'Tur' case