आमदार सुरेश धस यांच्यावर गुन्हा, कंटोनमेंट झोनमध्ये केलेला प्रवेश भोवला

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 May 2020

आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण या गावांत रविवारी (ता. १७) एकाच दिवशी सात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी गावे कंटोनमेंट झोन म्हणून जाहीर केली आहेत. कंटोनमेंट झोनमध्ये प्रवेश केल्याप्रकरणी विधान परिषद सदस्य सुरेश धस यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

आष्टी (जि. बीड) - संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करून कंटोनमेंट झोनमध्ये प्रवेश केल्याप्रकरणी विधान परिषद सदस्य सुरेश धस यांच्याविरुद्ध मंगळवारी (ता. १९) आष्टी पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यानंतर गुन्हे अन्वेषण शाखेने धस यांना ताब्यात घेतले आहे.

आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण या गावांत रविवारी (ता. १७) एकाच दिवशी सात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगवी पाटणसह खिळद, पाटण, कोहिनी व कारखेल तांडा ही तीन किलोमीटर परिसरातील पाच गावे कंटोनमेंट झोन म्हणून, तर चार किलोमीटर परिसरातील लिंबोडी, धामणगाव, सुरुडी, कारखेल बुद्रूक, डोईठाण, बावी, लाटेवाडी व महाजनवाडी ही आठ गावे बफर झोन म्हणून जाहीर केली आहेत. यामुळे ही गावे अनिश्चित कालावधीसाठी पूर्ण वेळ बंद करण्यात येऊन संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

हेही वाचा - बीड जिल्ह्यात ११ कोरोनाग्रस्त

सोमवारी (ता. १८) आमदार सुरेश धस यांनी सांगवी पाटण येथे जावून तेथील ग्रामस्थांशी संवाद साधला होता. यामुळे संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिस नाईक शंकर कळसाने यांनी सोमवारी आष्टी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (ता. १९) दुपारी आमदार धस यांना ताब्यात घेतल्याचे समजते. 

 

मुंबई-पुणे येथून अनधिकृतरित्या तालुक्यात चोरीच्या मार्गाने पोलिसांना चुकवून अनेक लोक तालुक्यात प्रवेश करीत आहेत. सांगवी पाटण येथे रुग्ण आढळल्याने त्या लोकांना भेटून धीर देऊन माघारी आलो. त्यामुळे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. यासाठी प्रशासनाला मी दोष देत नाही. राज्य शासनाने याबाबत ठरविलेल्या धोरणांमध्ये लोकप्रतिनिधी नसल्याने ही अडचण येत आहे. कुणीतरी प्रेस्टीज करून माझ्यावर गुन्हे का दाखल करीत आहे, ते मला कळायला मार्ग नाही. माझ्यावर दोन गुन्हे दाखल झाले म्हणून सराईत गुन्हेगारांना लावण्यात येणारी कलमेही माझ्यावर लावण्यात आली आहेत.
-सुरेश धस, विधान परिषद सदस्य


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Suresh Dhas was booked for entering the cantonment zone