मोबाईल चोराला अटक, नऊ मोबाईलसह दुचाकी जप्त 

प्रल्हाद कांबळे
मंगळवार, 24 मार्च 2020

सहाय्यक पोलिस निरीक्षक रवी वाहुळे यांनी एका चोराला अटक करून त्याच्याकडून नऊ किंमती मोबाईल व एक दुचाकी जप्त केली.

नांदेड : शहरातील गर्दीच्या ठिकाणाहून दुचाकी व बेसावध असलेल्या व्यक्तीच्या खिशातील मोबाईल लंपास करण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. मात्र या चोरट्याला पकडण्यास शिवाजीनगर पोलिसांना यश मिळाले असून गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रवी वाहुळे यांनी एका चोराला अटक करून त्याच्याकडून नऊ किंमती मोबाईल व एक दुचाकी जप्त केली. त्याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शहरातील मोबाईल व दुचाकी चोरांना पकडण्याचे सक्त आदेश पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड आणि पोलिस उपाधीक्षक (शहर) अभिजीत फस्के यांनी शहरातील ठाणेदारांना व गुन्हे शोध पथकाना सुचना दिल्या. यावरून शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनंत नरुटे यांनी आपले सहकारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक रवी वाहूळे यांना आपल्या हद्दीत गस्त घालण्यास सांगितले.
 
गुन्हे शोध पथकाची कामगिरी

यावरून श्री. वाहूळे यांनी त्यांच्या पथकातील पोलिस हवालदार संजय मुंडे, पोलिस नाईकस रामकिशन मोरे, लियाकत शेख, दिलीप राठोड, विशाल अटकोरे, शिलराज ढवळे, राजकुमार डोंगरे आणि काकासाहेब जगताप यांना सोबत घेऊन श्रावस्तीनगर भागात गस्त घातली. यावेळी शुभम जालींदर दवणे (वय १९) रा. श्रावस्तीनगर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक विनाक्रमांकाची होंडा शाईन कंपनीची दुचाकी व विविध कंपनीचे नऊ मोबाईल असा एख लाख ६४ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. अटक केलेला आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचानांदेडचे सहा विद्यार्थी मॉरिशसमध्ये अडकले...पालकमंत्र्यांनी घातले लक्ष...

योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाचे काम स्थगीत

नांदेड : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाचे कामकाज सोमवार (ता. २३) मार्चपासून पुढील आदेशापर्यत स्थगित करण्यात आले आहे. सोमवार (ता. २३) मार्चपासून कार्यालयात फक्त वाहन नवीन नोंदणीचे सर्व काम सुरु राहील. याची संबंधीत नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक, खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासनाने वेळीच उपाययोजना केल्या आहेत. प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात विविध कामानिमित्त मोठ्या प्रमाणात अभ्यागतांचे येणे जाणे असल्यामुळे गर्दी जमा होते. त्यामुळे कोरोना व्हायरस प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाचे कामकाज पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mobile thief arrested, bike confiscated along with nine mobiles nanded news.