नांदेडचे सहा विद्यार्थी मॉरिशसमध्ये अडकले...पालकमंत्र्यांनी घातले लक्ष...

अभय कुळकजाईकर
मंगळवार, 24 मार्च 2020

कोरोनामुळे महाराष्ट्रातील नांदेडचे सहा विद्यार्थी मॉरिशसमध्ये अडकले असून त्यांची सुटका व्हावी, यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मदतीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिले आहे. 

नांदेड ः कोरोना विषाणुमुळे भारतात येणारी सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द झाली आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील नांदेडचे सहा विद्यार्थी मॉरिशसमध्ये अडकून पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे.

मराठवाड्यातील नांदेड शहरातील रहिवासी असलेले संकेत पानपट्टे, ऋतुज माने, अनिरूद्ध कुलकर्णी, गौरव देशपांडे, अमरदीप जगताप आणि शंकर नादरे हे हॉटेल मॅनेजमेंटचे सहा विद्यार्थी चार महिन्यांपूर्वी इंटर्नशिपसाठी मॉरिशसला गेले होते. ता. २४ मार्च रोजी ते भारतात परतणार होते. परंतु, विमानसेवाच रद्द झाल्याने ते मॉरिशसमध्ये अडकून पडले आहेत. या विद्यार्थ्यांचा व्हिसा ता. २५ मार्च रोजी संपणार आहे. त्यामुळे याबाबत या विद्यार्थ्यांसह पालकही चिंतेत पडले.

हेही वाचा - सर्व इएमआय, इन्स्टॉलमेंट्सची वसुली तात्पुरती थांबवा

ठोस उत्तर मिळाले नाही
कोरोनाचे संकट उद्भवल्यानंतर या विद्यार्थ्यांनी मॉरिशसमधील भारतीय दुतावासाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना तिथून प्रतिसाद मिळालेला नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. विमाने रद्द होत असताना त्यांनी परतीच्या तिकिटासंदर्भात संबंधित विमान कंपन्यांशी सुद्धा संपर्क साधला, मात्र तिथेही ठोस उत्तर मिळाले नसल्याची त्यांची तक्रार आहे.

हेही वाचा - लोह्याच्या दोन क्वॉरन्टाईन रुग्णांना घेतले ताब्यात

मदतीसाठी हालचाली सुरू
या विद्यार्थ्यांना कुठूनच मदत मिळत नसल्यामुळे अखेर या विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी सोमवारी (ता. २३) रात्री सार्वजनिक बांधकाममंत्री व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. या प्रश्नाचे गांभीर्य जाणून घेत श्री. चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवून या विद्यार्थ्यांच्या अडचणींशी शासनाला अवगत केले. राज्य सरकारने देखील हा प्रश्न गांभिर्याने घेतला असून, सदर सहा विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

पालकमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना दिलासा
दरम्यान, अशोक चव्हाण यांनी आज या विद्यार्थ्यांशी दूरध्वनीवर बोलून त्यांना धीर दिला. त्यांच्या मदतीसाठी शासन प्रयत्नशील असून, विमानसेवा पूर्ववत होताच त्यांना मायदेशी आणले जाईल. तोवर त्यांनी सुरक्षित ठिकाणी स्वतःची काळजी घ्यावी आणि अडचण असल्यास केव्हाही संपर्क साधावा, अशा शब्दांत पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी त्यांना दिलासा दिला असल्याची माहिती जिल्हा प्रवक्ते संतोष पांडागळे यांनी दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six Nanded students trapped in Mauritius