‘या’ शहरात मोबाईल चोरांनी वळविला हॉस्पिटलकडे मोर्चा

mobile thief
mobile thief

नांदेड : शासकीय रूग्णालयापेक्षा खासगी रूग्णालयात दर्जेदार आरोग्य सुविधा मिळत आहेत. म्हणून सामान्य रूग्णदेखिल आता खासगी रूग्णालयात उपचार घेण्यासाठी धडपडत आहे. यासाठी रूग्णाने हवे तेवढे पैसे मोजायची तयारी ठेवलेली आहे. मात्र, याच खासगी रूग्णालयात रुग्णांची खरच काळजी घेतली जाते का? हा प्रश्नच आहे. रात्री बेरात्री कुणीही रुग्णालयात अगदी सहज प्रवेश करून रुग्णांचे पैसे आणि मोबाईल तसेच मौल्यवान वस्तुंवर डल्ला मारत असल्याचे प्रकार घडत आहेत. रुग्णालय प्रशासन मात्र याची फारशी दखल घेत नसल्याने रुग्णांमध्ये याची धास्ती बसली आहे. 


सध्या मोबाईल चोरांनी नांदेड शहरातील मोठ्या हॉस्पीटलमध्ये जाऊन चोऱ्या करण्याकडे आपला मोर्चा वळविला आहे. काही दिवसांपूर्वी शहरातील रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांच्या हातातील व कानाला लावून मोबाईलवर बोलणाऱ्या व्यक्तींचा मोबाईल हिसकावणाऱ्या चोरांची टोळी सक्रीय झाली होती. त्यापाठोपाठ आता मोबाईल चोरांनी मोठ्या हॉस्पिटलकडे आपला मोर्चा वळविला आहे. दररोज कुठल्या ना कुठल्या हॉस्पिटलमध्ये शिरून झोपेत असलेल्या रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांजवळचे मोबाईल व पैसे चोरीचा सपाटा सुरू असल्याने रुग्ण व नातेवाइकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

असा घडला प्रकार 
गुरूवारी (ता.२६) मध्यरात्री तीनच्या सुमारास एका चोरट्याने लोटस हॉस्पिलमध्ये शिरून गेटवर झोपेत असलेल्या सुरक्षारक्षकाला लाथ मारून जागे आहे की झोपेत, याचा अंदाज घेऊन चोर समोरील वार्डात शिरला आणि एकाच वार्डातील दोन रुग्णांच्या उशाखाली असलेले मोबाईल चोरून निघून गेल्याचे चित्र हॉस्पिलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. मात्र, असे असले तरी रुग्णालय प्रशासनाकडून मात्र मोबाईल चोरी प्रकरणाची फारशी दखल घेतली जात नाही. 

दखल घेणे गरजेचे
रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांकडून आज मोबाईल गेला, उद्या कुणाची मुले चोरीला जातील तेव्हा काय करायचे? असा प्रश्न रुग्णांच्या नातेवाइकांकडून उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्ण व नागरिकांनी आपले मौल्यवान वस्तू, दागिने सांभाळावेत, असे कुठेही बोर्ड लावण्यात आलेला नाही.

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनादेखील बसला फटका
उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्ण व नातेवाइकांना उपचार घेऊन बरे होण्याची काळजी असते. अनेक जणांकडे रुग्णालयात येताना पैसे सुद्धा नसतात. उसनवारी करून रुग्णालयात आलेले असतात. तेव्हा अशा रुग्णांना मोबाईल चोरीचा किमान दहा ते बारा हजारांचा फटका बसत आहे. या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनादेखील या मोबाईल चोरांचा फटका बसला असल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले.


कुणाकुणावर लक्ष ठेवणार ?
सध्या रुणालयात दोन सुरक्षारक्षक आहेत. रात्रभर रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक ये - जा करतात. त्यामुळे कुणाकुणावर लक्ष ठेवणार? त्यामुळे रुग्णांनी व त्यांच्या नातेवाइकांनी मौल्यवान वस्तू सांभाळाव्यात. - शाहेद सय्यद, व्यवस्थापक, लोटस हॉस्पिटल.


मोबाईल चोरटे दिसले सीसीटीव्हीत
परवा मी रुग्णालयात दाखल झालो. गुरुवारी हाताची शस्त्रक्रिया झाली आणि वार्डात शिफ्ट झालो. मोबाईल माझ्या डोक्याखाली होता. वार्डाचा दरवाजा लागत नसल्याने मध्यरात्री एक व्यक्ती वार्डात शिरली आणि त्याने वार्डातील दोघांचा मोबाईल चोरून नेला असल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात दिसत आहे. - मारोती इंगोले, रुग्ण.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com