गहाण जमिनी सावकाराच्या नावावर; मदत कशी मिळणार? 

महेश गायकवाड 
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

नुकसानग्रस्त पिकांचे प्रशासनाने पंचनामे केले आहेत. सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील अनेक कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या जमिनी सावकाराने स्वतःच्या नावावर केल्याने पीक नुकसानीची मदत कर्जबाजारी शेतकऱ्यांना मिळणार नाही. या दुहेरी संकटातून वाचविण्याची विनंती अशा शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा निबंधकांकडे केली आहे. 

जालना -  दुष्काळाच्या झळा सोसून नव्या उमेदीने कर्ज काढून घाम गाळला. मात्र हातातोंडाशी आलेले पीक परतीच्या पावसाने हिरावले. नुकसानग्रस्त पिकांचे प्रशासनाने पंचनामे केले आहेत. सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील अनेक कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या जमिनी सावकाराने स्वतःच्या नावावर केल्याने पीक नुकसानीची मदत कर्जबाजारी शेतकऱ्यांना मिळणार नाही. या दुहेरी संकटातून वाचविण्याची विनंती अशा शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा निबंधकांकडे केली आहे. 

हेही वाचा : बेघरांना मिळतोय 'आपुलकीचा' सहारा 

शेतकरी पुन्हा निराशेच्या दरीत
बॅंकेत आलेला नकारात्मक अनुभव किंवा अन्य काही कारणांमुळे ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांनी सावकारी कर्ज घेतले. कर्जाचा डोंगर वाढलेला असताना यंदाचे खरिपाचे पीक परतीच्या सततच्या पावसामुळे हातचे गेले. त्यामुळे शेतकरी पुन्हा निराशेच्या दरीत लोटला गेला आहे. खरीप हंगामासाठी काही शेतकऱ्यांनी सावकाराकडे शेती गहाण ठेवून कर्ज घेतले होते. या जमिनी शेतकऱ्यांच्या ताब्यात असल्या तरी सावकारांनी त्या स्वतःच्या नावावर करून घेतल्यामुळे पीक नुकसानीची मिळणारी मदतही सावकारांच्या खात्यावर जाण्याची भीती आहे. त्यामुळे शासनाकडून मदतीची आशा असलेले अनुदानही मिळणार नाही. सावकाराच्या खात्यावर जाणारी अनुदानाची मदत तरी मिळावी यासाठी विशेष पंचनामे करावेत, जमीन कसलेल्यांनाच नुकसानीचे अनुदान द्यावे, अशी मागणी अशा शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा निबंधकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, सावकारी व्यवहारात गेलेल्या जमिनी परत मिळविण्यासाठी काही कर्जबाजारी शेतकऱ्यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे दावा दाखल केलेला आहे. सध्या हे प्रकरण जिल्हा निबंधकांकडे न्यायप्रविष्ट असल्याचे सांगण्यात आले. 

जिल्ह्यात जवळपास दोनशे शेतकरी सावकारी कर्जाच्या जोखडात अडकले आहेत. माझी नऊ एकर जमीन सावकाराच्या ताब्यात आहे. व्यवहारात सावकारांनी या जमिनी स्वतःच्या नावावर करून घेतल्या आहेत. शासकीय योजनांचे अनुदान, पीकविम्याची रक्कम सावकारांना न जाता त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा, अशी आमची मागणी आहे. 
- सिद्धेश्‍वर केकाण, जिल्हाध्यक्ष, सावकारग्रस्त शेतकरी समिती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: money lenders