जालना - औद्योगिक वसाहत येथील शक्ती इलेक्ट्रॉन मिच्या गेटवर चार हल्लेखोरांनी एका उद्योजकाच्या मुनिमावर हल्ला करून तब्बल सात लाख ८० हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे. ही घटना बुधवारी (ता. १९) भरदुपारी घडली. दरम्यान, मुनीम आलम पठाण यांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
उद्योजक विशाल दाड हे आपले मुनीम आलम पठाण यांच्यासह बुधवारी (ता. १९) दुपारी राहत्या घरून सात लाख ८० हजार रुपयांची रोकड कारमधून कंपनीत घेऊन निघाले होते. विशाल दाड यांच्या शक्ती इलेक्ट्रॉन मिलच्या गेटवर कार आल्यानंतर विशाल दाड हे मिलमध्ये गेले. त्यानंतर त्यांचे मुनीम आलम पठाण हे कारमधून रोकडची बॅग घेऊन मिलमध्ये जात असताना दबा धरून बसलेल्या चार दरोडेखोरांनी त्यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला आणि त्यांच्याकडील सात लाख ८० हजार रुपयांची रोकड असलेली बॅग लंपास केली. दरम्यान, या हल्ल्यात आलम पठाण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा : जालना बनलाय गावठी बंदुकवाल्यांचा अड्डा?
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर, ‘एडीएस’चे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव, चंदनझिरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे यांनी रुग्णालयात धाव घेऊन जखमी आलम पठाण यांच्यासह उद्योजक विशाल दाड यांची चौकशी करून घटनेची माहिती घेतली.
शक्ती इलेक्ट्रॉन मिलच्या गेटवर हा लुटमारीचा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे या मिलच्या गेटवर साधा एक सुरक्षारक्षक देखील नव्हता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.