उष्णतेच्या लाटेत मॉन्सूनपूर्व सरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जून 2019

उमरग्यात सरासरी १८.२ मि.मि.पाऊस
उमरगा - उमरगा शहरासह परिसरातील गावांत आज सायंकाळी मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह तब्बल अर्धा तास मॉन्सूनपूर्व जोरदार पाऊस झाला. व्हंताळ येथे वीज पडून दोन गायी दगावल्या. दरम्यान, सोमवारी सायंकाळी व रात्री ९१ मिलिमीटर पाऊस झाला असून त्याची सरासरी १८.२ मिलिमीटर आहे. दरम्यान, तालुक्‍यातील कोरेगाव येथे झालेल्या वादळी वाऱ्याच्या तडाख्यात ७९ घरांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल देण्यात आला आहे.

बीडमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वारे, परंड्यात अर्धा तास पाऊस
बीड/उस्मानाबाद - तप्त ऊन, उकाड्याने चार महिने त्रस्त झालेल्या बीडकरांना मंगळवारी (ता. चार) सायंकाळी झालेल्या मॉन्सूनपूर्व पावसाने काहीसा थंडावा दिला. विजांचा कडकडाट, वादळासह मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. परळी तालुक्‍यातील काही भागांत पावसाने हजेरी लावली.

मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांच्या काही भागांत काल मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह हलका पाऊस झाला होता. अनेक ठिकाणी घरांवरील पत्रे उडून गेले. काही ठिकाणी वीज गुल झाली. त्यामुळे महावितरण, प्रशासनाला धावपळ करावी लागली. मराठवाड्या काही भागांत आजही पाऊस झाला.

बीडमध्ये मागच्या दोन दिवसांपासून आभाळ दाटून येत आहे. गेवराई तालुक्‍यातील काही भागांत काल वादळासह रिमझिम पावसाच्या सरी झाल्या. आजही दिवसभर तापमान ४३ अंशांवर होते. दुपारनंतर आभाळ आले. सायंकाळच्या वेळी वादळाला सुरवात होऊन विजांचा कडकडाट सुरू झाला. त्यानंतर बीड शहरात अर्धा तास मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.

सिरसाळा भागातही पावसाने काही वेळ हजेरी लावली. दरम्यान, पहिल्या पावसात भिजण्याचा शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आनंद घेतला. वादळ आणि पावसामुळे पिंपळनेर परिसरातील छावण्यांवरील छत उडून गेल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. बीडमध्ये या पावसाने सखल भागातील रस्ते आणि बसस्थानक परिसरात पाणी साचले. 

परंड्यात जोरदार सरी
परंडा - शहर व परिसरात आज सांयकाळी सव्वापाचच्या सुमारास मॉन्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या. हा पाऊस सुमारे अर्धा तास सुरू होता. गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या नागरिकांना या पावसाने मोठा दिलासा मिळाला आहे. रमजान ईद सणाच्या खरेदीसाठी आलेल्यांची पावसामुळे धावपळ उडाली.

गतवर्षी कमी पाऊस झाल्यामुळे भीषण दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागला. अनेक दिवसांपासून पशुधनाच्या पोटाची खळगी भरण्यासाठी घरदार सोडून चारा छावणीत तळ ठोकून राहिलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर या पावसाने चैतन्य निर्माण झाले आहे. गतवर्षी पावसाअभावी रब्बी व खरीप हंगाम वाया गेल्याने शेतकरी हतबल झाले होते. यंदा रोहिणी नक्षत्रामध्येच पावसाने सोमवारी व मंगळवारी हजेरी लावल्याने दिलासादायक चित्र आहे. आजच्या पावसाने रस्त्यांवर पाणी साचले होते. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या मंडई चौकात रमजान ईद व इतर खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची धावपळ उडाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Monsoon Rain