मुगाचे दर घसरल्याने लिलाव पाडला बंद

रमेश राऊत
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

वैजापूर बाजार समितीच्या शिऊरच्या उपबाजार केंद्रात मुगाच्या दरात मोठी घसरण झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सभापती, संचालकांशी मोबाईलवर संपर्क साधूनही त्यांनी येण्यास उशीर केल्याने एका शेतकऱ्याने वीज खांबावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी (ता. 11) सकाळी येथे घडली. सभापतीच शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकत नसतील तर कसे जगायचे, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

शिऊर (जि.औरंगाबाद) : वैजापूर बाजार समितीच्या शिऊरच्या उपबाजार केंद्रात मुगाच्या दरात मोठी घसरण झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सभापती, संचालकांशी मोबाईलवर संपर्क साधूनही त्यांनी येण्यास उशीर केल्याने एका शेतकऱ्याने वीज खांबावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी (ता. 11) सकाळी येथे घडली. सभापतीच शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकत नसतील तर कसे जगायचे, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

पंधरा दिवसांपूर्वी इतर बाजार समित्यांमध्ये मुगाला असलेला सहा हजार क्विंटलचा भाव बुधवारी पाचशे ते हजारापर्यंत ढासळला. शिऊरच्या उपबाजार केंद्रात सुरू असलेला मुगाचा लिलाव शेतकऱ्यांनी बंद पाडत सभापतींनी स्वतः हजर राहून जाब द्यावा, अशी मागणी केली. सकाळपासूनच उपाशीपोटी आलेले शेतकरी सभापतींची वाट पाहत चारपर्यंत ताटकळले. मात्र, दोन वाजता थांबवलेला लिलाव दोन तास उलटूनही सभापती, उपसभापती मार्केटमध्ये येत नसल्याने सुरू होत नव्हता. त्यामुळे खंडाळा येथील सुभाष सूर्यवंशी या शेतकऱ्याने विजेच्या खांबावर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला. बाजार समितीचे निरीक्षक दीपक शिंदे यांनी थांबवत समजाविण्याचा प्रयत्न केला. शिंदे यांनी स्वतः सभापती रामहरी जाधव यांच्याशी बोलून मार्केटमध्ये येण्याची विनंती केली.

सायंकाळी सहा वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रामहरी जाधव, संचालक ज्ञानेश्वर जगताप, सचिव शिनगर यांनी शिऊर येथील उपबाजार समितीस भेट देऊन शेतकऱ्यांचे म्हणणे जाणून घेतले. दरम्यान, इतर बाजारपेठेमध्ये वाढीव दर मिळत असून, शिऊर येथे भाव मिळत नसल्याने हमीभावाने शासकीय खरेदी सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. संचालक ज्ञानेश्‍वर जगताप यांनी पुढाकार घेऊन शेतकरी, व्यापारी यांच्यात समन्वय करण्याचा प्रयत्न करून फेरलिलावाबाबत सूचना केल्या.

शिऊर येथील बाजारपेठेमध्ये मूग खरेदीसाठी इतर व्यापारी येणार असून, शेतकऱ्यांना वाढीव दर मिळेल.
- रामहरी जाधव, सभापती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Moong Dal Bid Stopped