मुलाच्या निधनाची बातमी ऐकताच आईने सोडला प्राण, एकाच सरणावर दोघांचे अंत्यसंस्कार

दत्ता बोंडगे
Wednesday, 28 October 2020

ज्या मुलाला मांडीवर घेऊन चिऊ-काऊचा घास भरवला. बोट पकडून चालायला शिकवले. त्या मुलाचे निधन झाले. ही वार्ता वृद्ध आईला समजताच तिला हा आघात सहन झाला नाही.

औराद शहाजानी (जि. लातूर) : ज्या मुलाला मांडीवर घेऊन चिऊ-काऊचा घास भरवला. बोट पकडून चालायला शिकवले. त्या मुलाचे निधन झाले. ही वार्ता वृद्ध आईला समजताच तिला हा आघात सहन झाला नाही. जागेवरच ती ही गतप्राण झाली. एकाच सरणावर दोघांवरही अंत्यसंस्कार करण्यात आले. ही हृदयद्रावक घटना सोमवारी (ता. २६) घडली. आई या शब्दात, नात्यात त्याग, निःस्सीम प्रेम आहे. कुठलीही अपेक्षा न करता आई आपल्या मुलांची काळजी घेते.

बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना, बीड जिल्ह्यातील बर्दापूरात तणावाची स्थिती

त्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपते. आपले मुलं कितीही मोठे झाले तरी आईसाठी ते लहानच असते. त्यामुळे मानवी नात्यात आईच्या नात्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. याचाच प्रत्यय येथे आला. आपल्या मुलाच्या निधनाची बातमी ऐकताच आईने जागीच आपला प्राण सोडला. येथील पंडित वीरभद्र आर्य विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षक गोविंदराव चांदीवाले (वय ५९) यांचे सोमवारी सायंकाळी लातूर येथील खासगी रुग्णालयात उपचार चालू असताना निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी त्यांचे मूळगाव लखनगाव (ता. भालकी, जि. बिदर) येथे पोचली. या त्यांच्या आई अनसूयाबाई यांच्यावर मोठा आघात झाली. घटनेची माहिती मिळताच त्यांनी प्राण सोडले. या माय-लेकावर लखनगाव येथे मंगळवारी (ता.२७) रात्री अकरा वाजता एकाच सरणावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

संपादन - गणेश पिटेकर

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mother Died After Listening Son Death News Latur