
अहमदपूरमध्ये मोटारसायकल चोर जेरबंद, तीन लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त
अहमदपूर (जि.लातूर) : मोटारसायकल चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला रात्रीच्या गस्ती दरम्यान अटक केली असून चोरीच्या ७ मोटारसायकलींसह ३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी जिल्ह्यामध्ये होणारे चोरी व घरफोडी रोखण्यासाठी रात्रीची गस्त व अचानक नाकाबंदी वाहनांची व संशयास्पद व्यक्तींची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी बलराज लंजिले यांच्या सूचनेवरून शहर पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठल धुरपडे हे सहकाऱ्यांसोबत २२ जुलै रोजी पोलीस ठाणे हद्दीत रात्रीची गस्ती घालत असताना मध्यरात्री दोनच्या सुमारास एक जण त्याच्या कडील मोटरसायकल ढकलत लातूर रोडवरील एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी जाताना दिसला.
हेही वाचा: Timepass 3 : 'टाइमपास ३’ च्या कलाकरांनी रिक्षाचालकांसोबत धरला ठेका
गस्तीवरील अधिकाऱ्यास त्याचा संशय आल्याने त्याची चौकशी करत असताना तो भांबावून गेला. त्याला मोटरसायकलसह पोलीस ठाण्यात आणून विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सांगितले की मी सुनील बाबुराव धोत्रे (वय २४) असून देवणी तालुक्यातील दवन हिप्परगा गावचा आहे. माझ्याकडील मोटारसायकल लातूर येथील कृपा सदन इंग्लिश स्कूलमधून आणलेली असून मी अहमदपूर (Ahmedpur), उदगीर, लातूर (Latur) गांधी चौक व विवेकानंद पोलीस स्टेशन हद्द तसेच कर्नाटकमधून विविध ठिकाणाहून मोटारसायकल चोरी केल्याचे सांगितले.
हेही वाचा: सचिन खेडेकर म्हणतात - मराठीचा आग्रह धरु या, त्यामुळे नोकरी मिळेल!
त्याच्याकडून विविध कंपन्याची एकूण सात मोटारसायकली ज्याची किंमत ३ लाख ५० हजार रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये असून त्याच्याकडून आणखीन मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. गुन्ह्याचा पुढील तपास अहमदपूर पोलीस करत आहेत.
Web Title: Motorcycles Thief Arrested In Ahmedpur Of Latur Three Lakh 50 Thousand Items Seized
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..