खासदार संजय जाधव धमकी प्रकरणाची चौकशी सुरु

गणेश पांडे
Thursday, 29 October 2020

अद्याप कुणालाही ताब्यात घेतले नसल्याचा पोलिसांचा निर्वाळा

परभणी ः परभणीचे शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांना जीवे मारण्याचा कट करण्यात आला असल्याची तक्रार स्वता संजय जाधव यांनी बुधवारी रात्री पोलिसांकडे दिली होती. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून परभणी पोलिसांनी चौकशी समिती गठीत केली असून ही समिती विविध आघाड्यावर चौकशी करत आहे. परंतू अद्याप या प्रकरणात कुणालाही ताब्यात घेतले नाही किंवा अटक करण्यात आलेली नाही असा निर्वाळा पोलिसांनी दिला आहे.

परभणीचे शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांना जिवे मारण्याचा कट रचण्यात आला असल्याची तक्रार स्वता खासदार संजय जाधव यांनी बुधवारी (ता.27) रात्री नानलपेठ पोलिसांकडे दिली आहे. खरेतर हे प्रकरण चार ऑक्टोबर पासून सुरु आहे. परंतू प्रकरणाला गांभीर्याने घेत खासदारांनी याची माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह पोलिस अधिक्षक जयंत मीना व संबधीत वरिष्ठ पोलिसांकडे दिली होती. या प्रकरणी बुधवारी रितसर खासदार संजय जाधव यांनी तक्रार दिली आहे. नांदेड येथील रिन्ध्दा नावाच्या टोळीने खासदार संजय जाधव यांना जिवे मारण्याची सुपारी घेतली असल्याचे एका इन्फॉर्मरने खासदार श्री. जाधव यांना याची माहिती दिली होती. या प्रकरणी पोलिस अधिक्षक जयंत मीना यांनी तातडीने पावले उचलत हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची समिती नियुक्त केली आहे. या समितीने विविध आघाड्यावर प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. परंतू या प्रकरणात अद्यापही कोणत्याही संशयीतास किंवा अन्य कोणाला ताब्यात घेतले नाही किंवा अटकही केलेली नाही असी माहिती जिल्हा पोलिस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

हेही वाचालोअर दूधना धरणातून रब्बीतील पिकांना मिळणार पाणी- धरणात शंभर टक्के जलसाठा, शेतकर्‍यात समाधान

खासदार संजय जाधव यांना पोलिस संरक्षण

खासदार संजय जाधव यांच्या प्रकरणाला गांभीर्याने घेत पोलिसांकडून खासदार संजय जाधव यांना पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. तसेच पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुरुवारी त्यांच्या निवासस्थानाची पाहणी करून सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून काही सुचना देखील केल्या. यावरूनच पोलिस हे प्रकरण गांभीर्याने हाताळत असल्याचे दिसून येत आहे.

जिल्हाभरात चिंता व अटकेची मागणी

खासदार संजय जाधव यांना जिवे मारण्याचा कट रचणाऱ्या रिन्ध्दा टोळीला अटक करण्यात यावी अशी मागणी आता जिल्हाभरातून होत आहे. तालुक्यासह जिल्हा ठिकाणावरूनही टोळीला अटक करावी अश्या मागणीचे निवेदने प्रशासनाकडे देण्यात येत आहे. हा प्रकार गंभीर असल्याने जिल्हाभरातील राजकीय वर्तूळातून चिंता व्यक्त केली जात आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विशाल कदम यांनी त्यांच्या समर्थकांसह शुक्रवारी पोलिस अधिक्षक जयंत मिना यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान, त्यांनी पोलिस अधिक्षकांकडे याची चिंता व्यक्त केली. पोलिस अधिक्षकांनी या शिष्ठमंडळास तातडीने या प्रकरणात कारवाई केली जाईल असे आश्वासित केले आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Sanjay Jadhav begins probe into threatening case parbhani news