
अंबाजोगाईच्या ग्रामीण पोलिस ठाण्यात पोलिस कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असलेले राहुल ज्ञानोबा जाधव हे मूळचे लातूरचे आहेत.
अंबाजोगाई (जि.बीड) : कुटुंबाची जबाबदारी सांभाळत, नोकरी करतानाच अडचणीवर मात करीत राहुल जाधवने अखेर आपल्या ध्येयाला गवसणी घातली. पहिल्याच प्रयत्नात खात्याअंतर्गत त्याची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. याच महिन्यात लागलेल्या एमपीएससीच्या निकालात त्याने राज्यातून ६८ वा क्रमांक मिळविला.
वाचा - भयानक! दहा ते 12 रानडुकरांचा एकाच वेळी जीवघेणा हल्ला, रक्तबंबाळ झालेल्या शेतकऱ्याला वाचविण्यासाठी तरुण आले धावून
अंबाजोगाईच्या ग्रामीण पोलिस ठाण्यात पोलिस कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असलेले राहुल ज्ञानोबा जाधव हे मूळचे लातूरचे आहेत. त्यांचे वडील खासगी वाहनावर चालकाची नोकरी करत. राहुलचे शिक्षण लातूरच्याच विविध शाळेत झाले. सुरुवापासूनच त्याने पोलिस अधिकारी होण्याचे ध्येय बाळगले होते. परंतु घरची परिस्थिती बेताचीच असल्याने राहुलला नोकरी करण्याची गरज होती.
वाचा - वाहनाने दिली हुलकावणी अन् एकुलता एक मुलगा गेला आईवडिलांना अवेळी सोडून
उच्च माध्यमिक शिक्षण होताच वयाच्या २१ व्या वर्षी ते पोलिस दलात भरती झाले. त्यांनी (२०१६) मुक्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. याच काळात (२०१५) त्यांचे लग्नही झाले. त्यामुळे संसाराचा गाडा चालवत त्यांना हे ध्येय गाठायचे होते. नोकरी करतानाच त्यांनी स्पर्धा परीक्षेत तयारी सुरु केली. या काळात पोलिस उपनिरीक्षक पदाची तयारी करणारे दत्तात्रय व्हटकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
वाचा - पत्नी, दोन मुलांना मागे सोडून तरुण शेतकऱ्याने उचलले शेवटचे पाऊल; वडिलांच्या शेतातच!
आई सेंटरने वाढवले मनोबल
अभ्यास तर करायचा होता, त्यासाठी मार्गदर्शन व दिशा मिळण्याची गरज होती. त्यामुळे त्यांनी आई सेंटरचे संचालक नागेश जोंधळे यांची भेट घेतली. त्यांनीच मार्गदर्शन केले. त्यामुळे मनोबल वाढण्यास व सकारात्मक ऊर्जा मिळाली त्यामुळे २०१७ ची पूर्व व मुख्य परीक्षा उत्साहाने देता आली. तीन वर्षांनंतर या परीक्षेचा निकाल (ता. १०) फेब्रुवारीला जाहीर झाला. त्यात राज्यातून ६८ वा क्रमांक मिळवत पोलिस उपनिरीक्षक पदासाठी पात्र ठरले. आई, वडिलांचे सहकार्य, पत्नीची साथ आणि श्री. व्हटकर आणि श्री. जोंधळे यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरल्याचे राहुल जाधवने सांगितले.
सकारात्मक विचार व नियोजनबद्ध अभ्यासच हमखास यश मिळवून देते. राहुल जाधव सारखे जिद्द व चिकाटी अंगी बाळगणारे युवक निश्चितच अधिकारी पदावर पोचू शकतात. त्याचा हा प्रवासच २०२१ मध्ये येऊ घातलेल्या परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांना अधिक प्रेरणादायी ठरणारा आहे.
नागेश जोंधळे, संचालक, आई सेंटर, अंबाजोगाई
संपादन - गणेश पिटेकर