
औसा : ‘‘युती सरकार काळात विमा मिळत नाही म्हणून मोर्चे काढणारे आता सत्तेत असताना दोन ते अडीच वर्षांत शेतकऱ्याला एक नवा पैसा देऊ शकले नाहीत. याचे कारण म्हणजे मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र म्हणजे मुंबई वाटते. मुंबई व्यतिरिक्त महाराष्ट्र आहे हे त्यांना ठावूकच नाही. महाविकास आघाडी सरकारला शेतकऱ्यांशी काही घेणे-देणे नाही,’’ अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केली.
आमदार अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतून शेतरस्ते आणि मनरेगातून ग्रामसमृद्धी अभियानातील कामाचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा होते. फडणवीस म्हणाले, ‘‘महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या योजनांना निधी देत नाही. युती सरकारच्या काळात जलयुक्त शिवार योजनेमुळे पाणी पातळीत वाढ झाली. मराठवाड्यात दुष्काळ निर्मूलनाच्या कामात या योजनेचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. आम्ही जागतिक बँकेकडून आणलेले पैसे खर्च करायला हे सरकार तयार नाही.
संपूर्ण महाराष्ट्रात अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ऊस उत्पादकाला मोदींनी जिवंत ठेवले. एफआरपी ठरवली आणि कारखाने वाचविले. पण, राज्यात सत्तारूढ पक्षाच्या कार्यकर्त्यांचाच ऊस तोडला जात आहे. विरोधी गटाच्या उसाला जाळण्यासाठी ठेवले जात आहे. शेतकऱ्याला एक पैसाही हे सरकार देऊ शकलेले नाही.’’आम्ही आमच्या कार्यकाळामध्ये शेतकरी संकटात असताना अनुदान देऊन त्याला सावरले. पण, आता शेतकरी, मजूर, गोरगरीब लोकांच्या कल्याणासाठी राबविल्या जाणाऱ्या सर्व योजनांचा या सरकारने सत्यानाश केला, असा आरोपही फडणवीस यांनी केला. खासदार सुधाकर श्रृंगारे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, माजी आमदार पाशा पटेल यांची उपस्थिती होती.
खतांचा सुरळीत पुरवठा : खुबा
मोदी सरकार सुरळीत खत पुरवठा करीत आहे. देशात व महाराष्ट्रात जशी मागणी तसा खताचा पुरवठा मोदी सरकारकडून सुरू आहे. यामुळे देशातील १५ हजार कोटी शेतकरी समाधानी आहेत. सोलरपंपासाठी जेवढी मागणी कराल तेवढा पुरवठा केला जाईल. त्याच बरोबर छतावरील सोलारसाठीही मागणीच्या तुलनेत केंद्राकडून पुरवठा केला जाणार आहे. जनऔषधी योजनेतून स्वस्त दरात औषधे दिली जात आहेत, अशी ग्वाही केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.