डॉक्टरांच्या सुरक्षा किटसह उपकरणांसाठी मुंदडांकडून ५० लाखांचा निधी 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 March 2020

शासकीय सेवेतील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक साधनसामग्री खरेदी करण्यासाठी आमदार नमिता मुंदडा यांनी त्यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून ५० लाख रुपये उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. 

अंबाजोगाई (जि. बीड) - कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हापातळीवर राबविला जात असलेला पॅटर्न इतरांसाठी आदर्शच ठरत आहे. आता या लढ्यातील शासकीय सेवेतील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक साधनसामग्री खरेदी करण्यासाठी आमदार नमिता मुंदडा यांनी त्यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून ५० लाख रुपये उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. 

शासकीय सेवेतील डॉक्टरांना ‘पीपीई’ची (पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट) मागणी जोर धरत आहे. दरम्यान, अद्याप जिल्ह्यात रुग्ण आढळला नसला तरी भविष्यात काही अपरिहार्य बाब घडली तर आरोग्य यंत्रणा सक्षम असावी आणि डॉक्टर व नर्स तसेच इतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपकरणे व साधने उपलब्ध असावीत, यासाठी त्यांनी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

हेही वाचा - कोरोना विषाणू येऊच नये म्हणून....

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय, केज, नांदूरघाट येथील ग्रामीण रुग्णालये, लोखंडी व नेकनूर येथील शासकीय रुग्णालये, तसेच केज मतदारसंघातील विडा, अपेगाव, भावठाणा, आडस, युसूफवडगाव, चिंचोली माळी, येळंबघाट व बनसारोळा आरोग्य केंद्रांतील डॉक्टर-कर्मचाऱ्यांच्या सुरक्षा किटसह इतर उपकरणांसाठी निधी देण्याबाबत त्यांनी पत्र दिले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mundada funds Rs 50 lakh for equipment including a doctor's safety kit