वैद्यनाथ कारखान्याच्या थकहमीवरुन मुंडे बहीण,भाऊ आमने-सामने; दहा कोटींवरुन श्रेयवादाची लढाई

दत्ता देशमुख
Thursday, 24 September 2020

 वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला राज्य सरकारने १० कोटी ७७ लाखांची थकहमी दिल्यावरुन पंकज मुंडे व धनंजय मुंडे यांच्यात श्रेयवादावरुन चर्चा सुरु झाली आहे.

बीड : भाजप नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला राज्य सरकारने १० कोटी ७७ लाखांची थकहमी दिली. यावरुन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांच्यात जुंपली आहे. मंत्रिमंडळाच्या मंगळवारी (ता. २२) झलेल्या बैठकीत थकहमीच्या विषयावर वैद्यनाथ कारखान्यासाठी धनंजय मुंडे यांनी आग्रह धरल्याचे सांगण्यात आले.

लोकनेते गोपीनाथ मुंडे व पंडित अण्णा मुंडे यांच्या प्रयत्नांतून वैद्यनाथ कारखान्याचा आशिया खंडात लौकीक झाला. अशा या कारखान्यातील कर्मचाऱ्यांवर वेतनासाठी उपोषणाची वेळ यावी, हे दुर्दैवी असल्याचे मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले होते. राज्य सरकारने दिलेल्या थकहमीचा कारखाना प्रशासनाने योग्य वापर करून शेतकरी, कर्मचाऱ्यांचे हित जोपासावे, थकीत बिले, पगार करावेत, कारखान्याला भविष्यात कधीही मदत लागल्यास सरकारच्या माध्यमातून देण्यास तत्पर असेन, असेही धनंजय मुंडे म्हणाले होते.

फक्त अर्ध्या अन् पाव गुणाने जाणार एमपीएससीचा निकाल, आयोगाकडून अपूर्णांकाचा आधार

पाठपुराव्याला यश
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, साखर संघाकडे आपण वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळेच वैद्यनाथ साखर कारखान्याला राज्य सरकारने १० कोटी ७७ लाख रूपये थकहमी मंजूर केली आहे. यात इतरांनी श्रेय घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे वैद्यनाथ कारखान्याच्या अध्यक्षा पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. यापूर्वीच जाहीर झालेल्या कारखान्यांच्या यादीत वैद्यनाथ कारखान्याचा समावेश होता, असेही त्या म्हणाल्या.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Munde Sister And Brother Before Eachother Over Vaidyanath Mill's Aid