
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे तालुक्यातील झरा येथील सोनाजी दत्तराव तडस वय साठ यांचे गावालगत सात एकर शेत आहे.
कळमनुरी (जिल्हा हिंगोली) : तालुक्यातील झरा येथे शेतामधील आखाड्यावर ६० वर्षीय शेतकऱ्याचा डोक्यात वार करून खून केल्याची घटना रविवार ता. सहाला उघडकीस आली आहे. याप्रकरणी कळमनुरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणी आरोपीचा शोध घेण्यासाठी तपासासाठी पथके नेमण्यात आली आहेत.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे तालुक्यातील झरा येथील सोनाजी दत्तराव तडस (वय 60) यांचे गावालगत सात एकर शेत आहे. येथे त्यांनी आखाडा टिन शेड उभारणीसाठी लागणारे साहित्य आणून टाकले आहे. लोखंडी अँगल पत्रे व इतर साहित्याच्या माध्यमातून टिन शेड उभारणी करण्याकरिता लागणारे साहित्य शेतात असल्यामुळे सोनाजी दत्तराव तडस हे शनिवार (ता. पाच ) सायंकाळी घरून शेतामध्ये झोपावयास गेले होते. मात्र रविवार सकाळी लवकर घरी परत न आल्यामुळे त्यांच्या शेजारील आखाड्यावरील नातेवाईकांनी शेतात येऊन पाहणी केली.
हेही वाचा - पालकांनो सावधान : नांदेड शहरातही आता कॉफी सेंटरही डबल डेक्कर, पाल्यावर ठेवा लक्ष
यावेळी सोनाजी तडस यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. सोनाजी तडस यांचे कुटुंबीय व गावातील नागरिकांनी या घटनेची माहिती कळमनुरी पोलिसांना दिली. अतिरिक्त पोलिस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख ,पोलिस निरीक्षक रणजित भोईटे ,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास रोयलावार यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
यावेळी सोनाजी तडस यांच्या डोक्यामध्ये लोखंडी वस्तूने मारहाण केल्याचा अंदाज काढण्यात आला. पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून श्वान पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. घटनास्थळी आढळून आलेले लोखंडी अँगल, रॉड इत्यादी साहित्यामधून तपासकामी मारेकऱ्यां चे ठसे मिळतात का यादृष्टीने ठसे तज्ञांनाही घटनास्थळी बोलविण्यात आले. याप्रकरणी कळमनुरी पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी झरा व परिसरात या घटनेतील आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक नेमली आहेत. याप्रकरणी कळमनुरी पोलिसांनी राजेंद्र तडस यांच्या तक्रारीवरून खुनाचा व शेतामधील नऊ हजार रुपये किमतीचे लोखंडी अँगल चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
संपादन - प्रल्हाद कांबळे
|