
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून सुंदर माझे गाव, स्वच्छ माझे कार्यालय हे अभियान संपूर्ण मराठवाडा विभागात राबविण्यात येत आहे.
हिंगोली : स्वच्छ माझे कार्यालय, सुंदर माझे गाव या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या १०० अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शनिवारी (ता. २३) रॅलीत सहभाग घेऊन हिंगोली ते औंढा असे २४ किलोमीटरचे अंतर सायकलवर पार करून जागोजागी स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. रॅलीला जिल्हा परिषद अध्यक्ष गनाजी बेले, उपाध्यक्ष मनीष आखरे यांनी हिरवी झेंडी दाखविली.
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून सुंदर माझे गाव, स्वच्छ माझे कार्यालय हे अभियान संपूर्ण मराठवाडा विभागात राबविण्यात येत आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेचे सीईओ राधाबीनोद शर्मा, अतिरिक्त सीईओ अनुप शेंगुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी यांनी तालुकास्तरावर पंचायत समिती कार्यालयाला भेटी देऊन स्वच्छ माझे कार्यालय अभियान राबविण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती, बालविकास प्रकल्प, आदी विभागात आठवड्यापूर्वी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शुक्रवारी विभागीय उपायुक्त सुरेश वेदमूथा यांनी अधिकारी यांची कार्यशाळा घेतली. तसेच अर्थविभाग,सामान्य प्रशासन विभाग, आरोग्य विभागांना भेटी देऊन समाधान व्यक्त करीत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
हेही वाचा - जागतिक हस्ताक्षर दिन विशेष : विद्यार्थ्यांच्या सुंदर हस्ताक्षरासाठी पांडुरंग चोपडे यांची धडपड?
सुंदर माझे गाव, स्वच्छ माझे कार्यालय या अभियानाची तालुकास्तरावर प्रसिद्धी व्हावी हा या पाठीमागचा उद्देश आहे. त्यामुळे शनिवारी जिल्हा परिषदेच्या अधिकारी कर्मचार्यांनी रॅलीचे आयोजन केले होते. त्यानुसार ही रॅली जिल्हा परिषदेच्या प्रांगणातून सकाळी साडेसहा रॅलीला हिरवी झेंडी दाखवताच पुढे मार्गस्थ झाली. या रॅलीत सीईओ राधाबीनोद शर्मा ,अतिरिक्त सीईओ अनुप शेंगुलवार,डेप्युटी सीईओ धनवंत माळी, गणेश वाघ, आत्माराम बोन्द्रे, डॉ. शिवाजी पवार, शिक्षणाधिकारी पी. बी.पावसे, संदीप कुमार सोनटक्के, चंद्रकांत वाघमारे,प्रशांत दासरवार ,लव्हेश तांबे यांच्यासह विविध विभागातील कर्मचारी सहभागी झाले होते.
पुढे ही रॅली लिंबाळा मक्ता येथे पोहचताच पंचायत विस्तार अधिकारी विष्णू भोजे,ग्रामसेवक यांनी पंचायत समितीच्या वतीने स्वागत केले .या ठिकाणी पाणी पाऊचचे वाटप करण्यात आले. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय ,व अंगणवाड्याची रंगरंगोटीची पाहणी केली. त्यानंतर संतुक पिंपरी, डिग्रस कऱ्हाळे , येहळेगाव सोळंके येथे शाळेमध्ये सत्काराचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर रॅली औंढ्यात दाखल झाली. या ठिकाणी गटविकास अधिकारी जगदीश साहू, व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी रॅलीचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.ठिकठिकाणी स्वच्छतेचे महत्व नागरिकांना पटवून देण्यात आले.
संपादन -प्रल्हाद कांबळे