हिंगोली जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांत जमिनीतुन पुन्हा गुढ आवाज

राजेश दारव्हेकर
Thursday, 4 June 2020

दोन दिवसापुर्वी येथे आलेला आवाज हा भुकंपाचा सौम्य धक्‍का असल्याची नोंद झाली
आहे. परत गुरूवारी (ता. चार) सकाळी अकरा वाजता पांगरा शिंदे, पोतरा या गावात जमिनीतून गुढ आवाज आला.

हिंगोली : वसमत व कळमनुरी तालुक्‍यातील काही गावात जमिनीतुन गुढ आवाज येण्याची मालिका सुरूच असून दोन दिवसापुर्वी येथे आलेला आवाज हा भुकंपाचा सौम्य धक्‍का असल्याची नोंद झाली आहे. परत गुरूवारी (ता. चार) सकाळी अकरा वाजता पांगरा शिंदे, पोतरा या गावात जमिनीतून गुढ आवाज आला.

वसमत तालुक्‍यातील पांगरा शिंदे येथे मागच्या अनेक वर्षापासून जमिनीतून गुढ आवाज येण्याची मालिका सुरू आहे. कधी या आवाजाची भुकंपाचा सौम्य धक्‍का असल्याची नोंद होत आहे. आतापर्यत दोन वेळेस त्‍याची लातुर येथील भुपंकमापक यंत्रावर नोंद झाली आहे. तर अनेक वेळेस झालेल्या गुढ आवाजाची मात्र कुठेही नोंद नसली तरी हे आवाज मात्र सारखे येतच आहेत. आज सकाळी अकरा वाजता वसमत तालुक्‍यातील पांगरा शिंदे येथे जमिनीतुन गुढ आवाज आला तो वापटी, कुपटी, सिरळी, खापरखेडा, खांबाळा या गावात देखील आला आहे.

हेही वाचा -  लाॅकडाउनमध्ये जुळल्या दुरावलेली नाती, कशी? ते तुम्ही वाचाच

दोन दिवसापूर्वीचा धक्का रिश्चटर स्‍केलवर 3.4 नोंद झाली होती

हा आवाज आल्याने या गावाला लागूनच असलेल्या कळमनुरी तालुक्‍यातील पोतरा, सिंदगी, बोल्‍डा, जांब या गावात देखील जमिनीतून गुढ आवाज आला आहे. मागच्या दोन दिवसापुर्वीच या गावात भुकंपाचा सौम्य धक्‍का बसून त्‍याची रिश्चटर स्‍केलवर 3.4 अशी नोंद झाली होती. आज झालेल्या आवाज हा साधारण असल्याचे गावकरी सांगत आहेत, मात्र आवाज झाल्याने नागरीक भयभीत होत आहे. सतत होणाऱ्या या आवाजाने नागरीकांच्या मनात भिती वाढली आहे. प्रशासनाने या गावातील नागरिकांना येथे सतत येणाऱ्या आवाजाबाबत मार्गदर्शन करावे अशी मागणी गावकऱ्यातून केली जात आहे.

आवाजाचे गुढ उकलावे असे गावकरी सांगत आहेत

दरम्‍यान, वसमत तालुक्‍यातील पांगरा शिंदे येथे अनेक वर्षापासून येणाऱ्या या आवाजाबाबत स्‍वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठातील टीमने येथे एक वेळेस पाहणी केली. मात्र येणाऱ्या आवाजाबाबत काही माहिती दिली नाही. हे आवाज कशाने येत आहेत. का येत आहेत या बाबत गावकऱ्यांना काहीही सांगितले नाही. जिल्‍हा आपती व्यवस्‍थापनाने देखील या आवाजाची अद्याप कोणतेही माहिती दिलेली नाही. येथे रात्रीबेरात्री सतत होणारे आवाज यामुळे गावकऱ्यांच्या झोपा उडत असल्याने याकडे प्रशासनाने लक्ष देवून आवाजाचे गुढ उकलावे असे गावकरी सांगत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mysterious sound again from the ground in 'this taluka of Hingoli district