उमाकांत मिटकर यांचे दातृत्व; पुरस्कारांची रक्कम एकल महिलांच्या कार्यासाठी

भगवंत सुरवसे
Sunday, 10 January 2021

आतापर्यंत ४३ पुरस्कारातून मिळालेल्या ९ लाख रूपयापेक्षा जास्त रकमेचे केले विविध सामाजिक  संस्थेला दान.

नळदुर्ग (उस्मानाबाद): पुणे येथील नातू फौंडेशनचा ‘सुलोचना नातू सेवाव्रती’ पुरस्कार उमाकांत मिटकर यांना शनिवारी ( ता.नऊ ) रोजी देण्यात आला. या पुरस्काराची मिळालेली २५ हजार रूपये रक्कम त्यांनी वात्सल्य सामाजिक संस्थेच्या माध्यमातून चालणाऱ्या एकल महिलांच्या कामासाठी देत सामाजिक उत्तरदायीत्व निभावले आहे. विशेष बाब म्हणजे उमाकांत मिटकर यांना आतापर्यंत ४३ पुरस्कारातून मिळालेल्या ९ लाख ५७ हजार रूपयाची रक्कम  विविध संस्थेला दान दिली आहे.

सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी नातू फाऊंडेशनचा हा पुरस्कार दिला जातो. उमाकांत मिटकर यांनी भटके विमुक्त समाजासाठी भरीव योगदान दिले आहे. महाराष्ट्रातील अनेक जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांना या पुरस्काराने सन्मानित केले आहे. पद्मभूषण डॉ.अशोकराव कुकडे यांच्या हस्ते सेनापती बापट रोड वरील नातू सभाग्रहात हा  कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर नातु फाऊंडेशनचे विश्वस्त चंद्रशेखर यार्दी, विवेक गिरधारी, श्रीमती अभया टिळक, ऋषीकेश गोडसे उपस्थीत होते. औरंगाबाद येथील डॅा.दिवाकर कुलकर्णी यांना महादेव बळवंत नातू पुरस्काराने गौरविण्यात आले.

अर्ध्यावरती डाव मोडला... अपघातात पतीचा मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी

तुळजापूर आणि परिसरात वात्सल्य सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ७८ विधवा, परित्यक्ता, बेघर, अनाथ महिलांसाठी सेवाकार्य चालवले जाते, या महिलांच्या स्वावलंबनासाठी सदरील पुरस्कारात मिळालेली रक्कम उमाकांत मिटकर यांनी संस्थेच्या मार्गदर्शीका अनिता जाधवर यांच्याकडे अशोकराव कुकडे यांच्या हस्ते सुपूर्त केली.

उमाकांत मिटकर यांनी युनोस्कोचा इनोव्हेशन पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा राज्य युवा श्री पुरस्कार यासह ४३ पुरस्काराची रक्कम विविध सामाजिक संस्थांना दान केली आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Naldurg news Umakanth Mitkar Generosity Prize money donated