नांदेड जिल्ह्यासाठी ३० हजार सुरक्षा किटची गरज

शिवचरण वावळे
Wednesday, 1 April 2020

देशातील अनेक रुग्णालयात काम करणाऱ्या आरोग्य अधिकारी - कर्मचारी हे अतिशय तोकड्या सुरक्षेच्या बळावर कोरोना बाधित रुग्णांची काळजी घेत आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादूर्भाव हळुहळु वाढत आहे. त्या दृष्टिने राज्य सरकार कठोर पावले उचलत आहे. 

नांदेड : राज्यात ‘कोरोना’चा वाढता प्रभाव बघता रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या डॉक्टर, नर्स, पोलीस कर्मचारी, सफाई कामगार, आशा वर्कर असे अनेकजन जिवाचे रान करत आहेत. परंतु त्यांचीच सुरक्षा धोक्यात आली असल्याने त्यांना देखील सुरक्षेच्या दृष्टीने मास्क, चष्मे, हॅन्डग्लोज, सुरक्षा किटची गरज भासणार आहे. नांदेड जिल्ह्यात ३० हजार सुरक्षा किटची गरज आहे.

मंगळवारी (ता.३१) जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हाधिकरी डॉ. विपीन इटनकर यांच्या दालनात आरोग्य अधिकारी व इंडियन मेंडीकल असोसिएशन (आयएमए) संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आरोग्य सेवेच्या दृष्टीने आढावा घेतला. यावेळी जिल्ह्यातील डॉक्टर, नर्स, पोलीस कर्मचारी, सफाई कामगार, आशा वर्कर यांच्याकरिता ३० हजार सुरक्षा किटची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले, त्यानंतर पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आरोग्य कर्मचारी यांना सुरक्षा किट पुरविण्यात येणार असल्याचे सांगितले.

 हेही वाचा- श्री गुरुगोविंदसिंघजी स्मारक रुग्णालयासाठी तीन कोटीचा निधी मंजूर

एकही कोरोना बांधित रुग्ण नाही 
बुधवारी (ता. एक एप्रिल २०२०) पर्यंत जिल्ह्यात एकही कोरोना बांधित रुग्ण आढळुन आला नाही. मात्र (ता.१८ ते २२ मार्च २०२०) दरम्यान विदेशासह पुणे, मुंबई, नागपूर, अमरावती, तेलंगणा, आंध्रा अशा विविध ठिकाणाहून प्रवाशी नागरीक शहरात दाखल झाले आहेत. हळुहळु त्यांना घराबाहेर काढुन त्यांची ‘कोरोना’ची चाचणी करण्यात येत आहे. त्यामुळे रोज पाच ते सात प्रवाशी नागरीकांच्या स्वॅब नमुने घेऊन पुणे येथील प्रयोगशाळेत तपाणीसाठी पाठविण्यात येत आहेत. 

हे देखील वाचले पाहिजे- दिल्लीतील कार्यक्रमाचे कनेक्शन उस्मानाबादेत

पुन्हा - पुन्हा त्या मास्कचा वापर 
परंतु संशयितांच्या घशातील लाळेचे ‘स्वॅब’ घेताना आरोग्य कर्मचाऱ्यांकडे अतिशय तोकड्या सुविधेच्या आधारावर काम सुरु आहे. स्वॅब घेणाऱ्या व रोज येणाऱ्या संशयितांचे टेंम्परेचर तपासणी करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना पूर्ण सुरक्षा प्रदान करणारे मास्क, हॅन्डग्लोज, संपूर्ण शरीर झाकेल असा सुरक्षित ड्रेस, डोळ्यांच्या सुरक्षेसाठी चष्मा अशा आरोग्य साहित्यांची गरज आहे.   
सध्या नांदेड शहरात मास्‍कच नव्हे तर, डॉक्टारांसाठी लागणाऱ्या सुरक्षा किट, मास्क वेळेवर उपलब्ध होत नसल्याची काही डॉक्टर, आरोग्य अधिकारी, कर्मचारी नाराजी व्यक्त करत आहेत. अनेक डॉक्टरांकडे मास्क उपलब्ध नसल्याने एकदा वापरलेले मास्क पुन्हा त्याचे निरजंतुकीकरण करुन पुन्हा वापरावे लागत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded district needs 30,000 security kits Nanded News