अखेर नांदेडला मिळाला विरोधी पक्षनेता

नांदेड महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदाचे पत्र दीपकसिंह रावत यांना देताना महापौर दीक्षा धबाले.
नांदेड महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदाचे पत्र दीपकसिंह रावत यांना देताना महापौर दीक्षा धबाले.

नांदेड - नांदेड महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी दीपकसिंह रावत यांच्या नियुक्तीला मान्यता देण्यात आली असून त्याचे पत्र महापौर दीक्षा धबाले यांच्या हस्ते मंगळवारी (ता. सात) श्री. रावत यांना देण्यात आले. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला प्रश्‍न मार्गी लागला आहे.

नांदेड महापालिकेत सत्ताधारी कॉँग्रेस पक्ष असून विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष आहे. भाजपकडे सहा सदस्य असून यापूर्वी विरोधी पक्षनेते म्हणून गुरुप्रितकौर सोडी यांची निवड करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर भाजपच्या सदस्यांनी त्यास आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने या बाबत ता. एक मार्च २०१९ रोजी निर्णय दिला होता. तसेच सर्वोच्च न्यायालयाने ता. २० नोव्हेंबर २०१९ रोजी निर्णय दिला होता. त्यानंतर महापौर धबाले यांनी भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांची ता. सहा जानेवारी रोजी बैठक घेतली होती.

महापौरांनी घेतली बैठक 
न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहून घेण्यात आलेल्या या बैठकीला सहापैकी पाच सदस्य उपस्थित होते. या सदस्यांनी महापालिकेत भाजपचे विरोधी पक्षनेता म्हणून दीपकसिंह काशिनाथसिंह रावत यांची निवड करण्यास संमती दिली. त्यानुसार न्यायालयाच्या अधीन राहून महापौर धबाले यांनी विरोधी पक्षनेता म्हणून रावत यांच्या नावाला मान्यता दिली आहे व निवडीचे पत्र श्री. रावत यांना मंगळवारी दुपारी महापौर कक्षात देण्यात आले.

चिखलीकरांनी केले स्वागत
निवडीच्या वेळी श्री. रावत यांच्यासह भाजपचे महानगराध्यक्ष प्रवीण साले, मिलिंद देशमुख, विजय गंभीरे, विनय सगर, संजय घोगरे, नगरसेविका बेबीताई गुपिले, शांताबाई गोरे आदी उपस्थित होते. निवडीनंतर श्री. रावत यांनी भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची त्यांच्या वसंतनगर येथील निवासस्थानी भेट घेतली. या वेळी चिखलीकर यांनी त्यांचे पेढा भरवून स्वागत केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

विरोधकांची भूमिका सक्षमपणे बजावणार
महापालिकेत विरोधी पक्षनेतेपदाची भूमिका आपण सक्षमपणे बजावणार आहोत. या पूर्वीही आपण महापालिकेत विरोधी पक्षनेते म्हणून काम केले असून सत्ताधारी कॉँग्रेसचा मनमानीपणा चालू देणार नाही. महापालिकेत आपण नियम आणि कायद्याला धरून सक्षमपणे काम करू. संख्येने आम्ही कमी असलो तरी ती उणीव आम्ही सर्व जण भरून काढू आणि महापालिकेत नांदेडकरांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू.
- दीपकसिंह रावत, विरोधी पक्षनेते, नांदेड.

 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com