अनेक नांदेडकर पितात फुकटचं पाणी

भागवत पेटकर
शुक्रवार, 19 मे 2017

अनेक योजना या फक्त कागदावरच असून त्याची अंमलबजावणी संबंधित यंत्रणेकडून होत नसल्याच्या तक्रारी आहेत. अजूनही अनधिकृत नळजोडणीबाबत पाणीपुरवठा विभाग उदासीन असून कार्यवाहीच्या बाबतीत ठोस पावले उचललेली अजूनही दिसून येत नाहीत

नांदेड - एकीकडे महापालिका पाणीपुरवठा करण्यासाठी लाखो रुपये खर्च करत असताना दुसरीकडे मात्र अनधिकृत नळजोडण्याबाबत उदासीन असल्याचे चित्र आहे. अनेकांनी अनधिकृत नळजोडण्या घेतल्या असून काहींनी तर जलकुंभाला जाणाऱ्या पाइपलाइनवरच नळजोडण्या घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे.

महापालिकेच्या हद्दीत एकूण एक लाख दहा हजार मालमत्ताधारक आहेत. सध्या महापालिकेतर्फे दोन दिवसांआड ६० दशलक्षलीटर पाणीपुरवठा होतो. पालिका हद्दीत सध्या ४० जलकुंभ असून त्यापैकी ३८ सुरू आहेत. तसेच शहरात जवळपास ८४० किलोमीटर पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन आहे. ५८ हजार नळजोडण्या असून वर्षाला बीपीएल धारकांसाठी एक हजार रुपये, घरगुती जोडणीसाठी दोन हजार दोनशे तर व्यावसायिक जोडणीसाठी बारा हजार रुपये पाणीपट्टी असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागातर्फे देण्यात आली आहे.

महापालिकेला दरवर्षी पाणीपुरवठा करण्यासाठी जवळपास १६ कोटी रुपये खर्च होतात त्या मानाने उत्पन्न कमी असून वर्षाला साधारणतः १३ कोटी रुपये वसूल होतात. मात्र गेल्या दोन वर्षांपासून पाणीपट्टी भरणाऱ्यांची संख्या कमी होत गेल्यामुळे थकबाकी वाढत चालली असून ती जवळपास शास्ती व दंडासह पन्नास कोटींच्या घरात गेली आहे.
महापालिकेच्या वतीने दरवर्षी उन्हाळ्यात अनधिकृत नळ जोडणीसाठी मोहीम उघडण्यात येते. त्यातून काही नळजोडण्या अधिकृत करण्यात येतात. सध्या एका नळजोडणीसाठी साधारणतः चार ते सहा हजार रुपये खर्च नळधारकास येतो. अनधिकृत नळजोडणी शोधमोहिमेबाबत मात्र महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे उदासीन धोरण आहे. त्याचबरोबर राजकीय हस्तक्षेप आणि नागरिकांमधील जनजागृतीची उदासीनता हे मुख्य कारण त्यामागे आहे.

नांदेड महापालिकेंतर्गत असलेल्या अनधिकृत नळजोडणीची शोधमोहीम सुरू असून त्यासाठी चारही क्षेत्रीय कार्यालयांतर्गत पथक नेमण्यात आले आहे. त्याचबरोबर ता. ३१ मेपर्यंत अभय योजना जाहीर करण्यात आली असून त्याअंतर्गत अनधिकृत नळ संंबंधितास अधिकृत करून घेता येणार आहे. मात्र असे असले तरी अनेक योजना या फक्त कागदावरच असून त्याची अंमलबजावणी संबंधित यंत्रणेकडून होत नसल्याच्या तक्रारी आहेत. अजूनही अनधिकृत नळजोडणीबाबत पाणीपुरवठा विभाग उदासीन असून कार्यवाहीच्या बाबतीत ठोस पावले उचललेली अजूनही दिसून येत नाहीत.

महापालिकेसमोर आव्हान
महापालिकेतील एकूण मालमत्तेच्या तुलनेत नळजोडणींची संख्या कमी आहे. कारण मालमत्ता एक लाख दहा हजार तर नळजोडणी फक्त ५८ हजार एवढीच आहे. काही जणांनी महापालिकेला कळविले नाही किंवा नोंदही केली नाही तरी देखील नळजोडणी घेतल्याची चर्चा आहे; तसेच काही महाभागांनी तर जलकुंभाला जाणाऱ्या पाइपलाइनवरच नळजोडणी घेतली असल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे अशांवर आता कारवाईची गरज आहे. याबाबत पाणीपुरवठा विभागाकडे चौकशी केली असता त्यांनी भविष्यात ३० हजार नळजोडणीधारक वाढविण्याचे तसेच १५० किलोमीटर भागात नळजोडणी तयार करण्याचे महापालिका प्रशासनासमोर आव्हान असल्याचे सांगितले आहे.

Web Title: Nanded infested with illegal water connections