नांदेड महापालिकेच्या फिरत्या रुग्णवाहिकेतून तपासणी...

अभय कुळकजाईकर
Thursday, 16 April 2020

नांदेड महापालिकेच्या वतीने फिरती रुग्णवाहिका तयार करण्यात आली असून त्याद्वारे डॉक्टर आणि आरोग्य सेवकाच्या पथकाकडून नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी दिली. 

नांदेड - आत्तापर्यंत शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. मात्र, असे असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून नांदेड महापालिकेने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरुच ठेवल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी महापालिकेच्या वतीने फिरती रुग्णवाहिका तयार करण्यात आली आहे. 

सध्या लॉकडाऊन असल्यामुळे अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद आहेत. त्याचबरोबर नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत एखादा आजारी पडला आणि त्याला खासगी डॉक्टरांकडे जाण्याची इच्छा नसेल तर अशा गरजू नागरिकांसाठी आरोग्य तपासणी करण्याची घरपोच सुविधा महापालिकेने फिरत्या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिली आहे. 

हेही वाचा - नांदेडला पायी किंवा गुपचुप येणाऱ्यांवर ठेवावे लागणार लक्ष

कृती कार्यक्रमाचे नियोजन
जिल्हाधिकारी डॉ. विपीन आणि महापालिका आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांया मार्गदर्शनाखाली कृती कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. महापालिकेकडे सध्या सात स्क्रिनिंग यंत्रे उपलब्ध आहेत. त्याद्वारे होम क्वारंनटाइन नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत स्वतंत्रपणे पाठपुरावा सुरु आहे. तसेच दुसरीकडे ज्यांना सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखी अशा स्वरुपाची लक्षणे आहेत किंवा जुनाट तसेच मधुमेह, रक्तदाब आदी आजार असणारे व्यक्ती किंवा ज्येष्ठ नागरिक यांच्या तपासणीसाठी म्हणून महापालिकेने ही फिरती रुग्णवाहिका कार्यान्वित केली आहे. या रुग्णवाहिकेत महापालिकेचे डॉक्टर, दोन आरोग्य सेवक व एक नर्स असे पथक तसेच औषधी साठा असणार आहे. 

बारा रुग्णालयात यंत्रणा
दरम्यान, महापालिकेच्या शिवाजीनगर, हैदरबाग, जंगमवाडी, कौठा, सिडको, खडकपुरा, पोर्णिमानगर, करबला, श्रावस्तीनगर, अरबगल्ली, विनायकनगर, इतवारा या १२ रुग्णालयामध्ये तापीच्या आजार व उपचारासाठीची सुविधा स्वतंत्रपणे कार्यान्वित करण्यात आली आहे. या ठिकाणी तपासणी करण्यात येत आहे. महापालिकेचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेशसिंह बिसेन, डॉ. मोहमंद बदीओद्दीन, क्षयरोग अधिकारी डॉ. बळीराम भुरके तसेच इतर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी त्यासाठी प्रयत्न करत आहेत. 

हेही वाचलेच पाहिजे - भाजीपाला, फळांची शेतकरी ते ग्राहक थेट विक्री   

नागरिकांनी करावा संपर्क
लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये तसेच वैद्यकीय आणि आरोग्य संदर्भात महापालिकेच्या फिरत्या रुग्णवाहिकेची मदत घ्यावी. त्यासाठी प्रभागनिहाय दौरा नियोजन करण्यात आले असून त्याची माहिती ०२४६२ - २५४६४३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून घ्यावी, असे आवाहनही प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेशसिंह बिसेन यांनी केले आहे. त्याचबरोबर राज्यात काही ठिकाणी ‘सारी’ या आजाराचीही लक्षणे आढळून आली आहेत. त्यामुळे त्याबाबतही दक्षता घेण्यात येत आहे. कोरोनाप्रमाणेत सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे आहेत. त्यामुळे वेळीच उपचार व्हावा, यासाठी दक्षता घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded Municipal Investigation from a moving ambulance ..., Nanded news