न्यायाधीशपदावर नांदेड, परभणी, हिंगोलीचा दबदबा

file photo
file photo

नांदेड : राज्य लोकसेवा आयोगाकडून नुकत्याच घेण्यात आलेल्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी तथा दिवाणी न्यायाधीश  (कनिष्ठ स्तर) परीक्षेत नांदेडचे बारा वकील न्यायाधीश झाले. यात एक जण राज्यात बाराव्या स्थानी आहे.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून नुकत्याच प्रथमवर्ग न्यायाधीशपदासाठी परीक्षा घेण्यात आल्या होत्या. राज्यभरातील जवळपास पाच हजार परीक्षार्थी या परीक्षेला बसले होते. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून त्यात नांदेड जिल्हा न्यायालयात वकिली करणारे बारा जण यशस्वी झाले. त्यात पाच महिला वकिलांचा समावेश आहे. राज्यात बाराव्या स्थानी  निखील चव्हाण यांनी स्थान पटकावले. परीक्षेत यश मिळविलेल्या वकिलांमध्ये निखील चव्हाण, श्रीहरी कनकदंडे,  कपिल निवडंगे, अस्मिता निवडंगे,  उमामा अल अमुदी, जयक्रांती पांचाळ, आम्रपाली जोंधळे, श्याम कळसकर, कयामुद्दिन, स्नेहा उतकर, कंचनकौर गाडीवाले आणि बलबीर गोडबोले यांचा समावेश आहे. 


हेही वाचा :  झेडपीच्या कारभारीपदासाठी अंतर्गत डावपेच !

परभणीतील पाच तरुण वकिल न्यायाधीशपदी 


परभणी : २०१९ या वर्षामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगतर्फे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर या पदाकरिता घेण्यात आलेल्या परीक्षेत परभणी जिल्हा न्यायालय येथील पाच वकिलांची न्यायाधीशपदी निवड झाली आहे. सदर परीक्षेचा अंतिम निकाल शनिवारी (ता. २१) जाहीर करण्यात आला. त्यानुसार परभणी येथील गणेश खुपसे, विवेक राजूरकर , प्रतिभा कांबळे,  कांचन बागल व वैभव शेंडगे या तरुण विधिज्ञांची न्यायाधीशपदी निवड झाली आहे. हे पाचही जण तरुण असल्याने त्यांचे कौतुक होत आहे.   
 
कमी वयात मिळविले यश
परभणी येथील जिल्हा न्यायालयात कार्यरत जिल्हा न्यायाधीश सी. एम. बागल यांची मुलगी कांचन चंद्रकांत बागल असून तिची सुद्धा न्यायाधीशपदी निवड आहे. कांचनला सर्व निवड झालेल्या न्यायाधीशांपैकी सर्वात लहान असल्याचा मान मिळाला आहे. तिची वय २४ वर्षापेक्षा कमी आहे. याशिवाय हिंगोली न्यायालय येथील दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर हरिश शेंडगे यांचा मुलगा वैभव शेंडगे यांची पण न्यायाधीशपदी निवड झालेली आहे. हे सर्वजण परभणी जिल्हा न्यायालयात वकिली करतात. गतवर्षीचे यश लक्षात घेऊन २०२० या वर्षामध्येही न्यायाधीश या पदासाठीच्या परीक्षेकरिता मार्गदर्शन क्लासेस सुरू ठेवण्याचे निर्देश प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश परभणी हेमंत महाजन यांनी दिले आहेत. त्याप्रमाणे मार्गदर्शन क्लासेस दररोज जिल्हा विधी सेवा प्राधिकरण परभणीच्या कार्यालयात सुरू आहे. जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. राजेश चव्हाण यांनी  सहकार्य करण्याची हमी दिली आहे. या उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे.

विधी सेवा प्राधिकरणाचे विशेष सहकार्य
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे या परीक्षेची तयारी करिता मार्गदर्शन क्लासेस घेण्यात आले होते. या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबाबत सर्व न्यायाधीश व ज्येष्ठ विधिज्ञांचे मार्गदर्शन वेळोवेळी लाभले. परभणी वकील संघ, ज्येष्ठ  विधिज्ञ, शिवाजी लॉ कॉलेज येथील प्राध्यापकांनी परीक्षार्थींचे मार्गदर्शन केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शेख अकबर शेख जाफर यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयातील जागा अभ्यासाकरिता उपलब्ध करून दिली. 


श्वेता परिहार न्यायाधीशपदी 


जवळा बाजार(जि. हिंगोली) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगतर्फे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर या पदाकरिता घेण्यात आलेल्या परीक्षेत औंढा नागनाथ तालुक्‍यातील जवळा बाजार येथील श्वेता परिहार यांनी यश मिळविले आहे. त्यांना ११४ गुण मिळाले. 
जवळा बाजार येथील श्वेता शिवप्रसाद परिहार यांचे प्राथमिक शिक्षण शिवनेरी आश्रम शाळेत तर माध्यमिक शिक्षण इंदिरा गांधी कन्या विद्यालयात झाले. बारावीपर्यंतचे शिक्षण येथील सरस्‍वती कनिष्ठ महाविद्यायात झाले. त्‍यानंतर विधीच्या पदवीचे शिक्षण परभणी येथील शिवाजी लॉ कॉलेजमध्ये केले. या महाविद्यालयातून त्यांनी सुवर्णपदकही मिळविले होते. पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठातून मास्‍टर ऑफ लॉची पदवी घेतली. कठोर मेहनत व दृढ इच्छाशक्ती यामुळेच यश मिळाल्याचे श्वेता परिहार यांनी सांगितले. 


 

स्वअध्ययनावर भर
न्यायाधीश पदाच्या परीक्षेकरिता स्वअध्ययनासोबतच वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळाले. नियमित अभ्यास केल्यास नक्कीच यश मिळते. याचे सर्व श्रेय आई -वडिलांना आहे.
-विवेक राजूरकर, विधिज्ञ, परभणी


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com