नांदेड पॅटर्न आता राज्यभर ; कोणता ते वाचा 

photo
photo

नांदेड: कुपोषणाच्या समूळ उच्चाटनाने जिल्ह्यातील बालमृत्यू व गर्भवती माता मृत्यूदर रोखण्यासाठी राबविण्यात आलेला दुर्गा बाळ गणेश महोत्सवाचा नांदेड पॅटर्न आता राज्यभर राबविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्याच्या महिला व बालविकास सचिवांनी नांदेडच्या दुर्गा बाळ गणेश महोत्सवचे कौतुक केले. त्याचबरोबर कुपोषणमुक्तीचा नांदेड पॅटर्न राज्यभरात राबविण्याचे संकेतही त्यांनी राज्यभरातील जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे दिले.

गर्भवती महिलांचे हिमोग्लोबिन, वजन कमी असणे हा एक अभिशाप असून त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील २७० अंगणवाड्यांत दुर्गा बाळ गणेश महोत्सव राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील ९० अंगणवाडी पर्यवेक्षिकांमार्फत दोन हजार १९२ गर्भवती महिलांचा उपक्रमामध्ये समावेश करण्यात आला. उपक्रमांतर्गत निवडण्यात आलेल्या गर्भवती महिला दररोज दुपारी आपल्या घरून स्वत: जेवणाचा डबा आणून अंगणवाडी केंद्रामध्ये सहभोजन करतात. गावातील इतर मैत्रिणींसोबत गप्पांच्या मैफलीमध्ये पोटभर जेवणानंतर त्यांना अंगणवाडी केंद्रातच ‘आयएफए’च्या गोळ्या अंगणवाडी सेविका खाऊ घालतात.

हेही वाचा - VIDEO : सासऱ्याने पुरविला सुनेचा हट्ट : घरावर उभारला अश्वारुढ पुतळा
  
पोटभर जेवण, नियमित आरोग्य तपासणी, पचनास उपयुक्त औषधी या शिवाय तज्ज्ञ  डॉक्टरांचा सल्ला यामुळे गर्भवती महिलांची अपचनासह आरोग्याच्या समस्या अंगणवाडी स्तरावरच मिटल्याचा सकारात्मक परिणाम झाला. कुपोषणमुक्तीसाठी जिल्ह्यात मोजक्या अंगणवाडीच्या कार्यक्षेत्रात प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आलेल्या दुर्गा बाळ गणेश महोत्सवाचे श्री. काकडे यांनी मसुरी येथील देशपातळीवरील कार्यशाळेत नुकतेच सादरीकरण केले. दरम्यान, महोत्सवांतर्गत निवडण्यात आलेल्या अंगणवाडी केंद्रांना युनिसेफच्या अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या असून महिला व बालविकासचे राज्यस्तरीय अधिकाऱ्यांचे दौरे जिल्ह्यात वाढले आहेत. राज्यभरातील जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये कुपोषणमुक्तीच्या नांदेड पॅटर्नचे कौतुक झाले असून लवकरच राज्यस्तरावर हा उपक्रम राबविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

सशक्त बालकांच्या जन्मदरात वाढ
तत्कालीन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या दुर्गाबाळ गणेश महोत्सव सुरवातीला नवरात्र उत्सवापुरताच मर्यादित होता. अंगणवाडी स्तरावर गर्भवती महिलांचा सहभाग वाढल्याने गणेशोत्सवाची मुदत ठरविण्यात आली. मात्र, गर्भवती महिलांचा आग्रह आणि वाढता सहभाग लक्षात घेऊन जिल्हाभरातील निवड करण्यात आलेल्या अंगणवाडी केंद्रांतर्गत दुर्गा बाळ गणेश महोत्सव नियमित राबविण्यात आला. त्यामुळे महोत्सवात सहभागी गर्भवती महिलांचे एकही बालक तीन किलोपेक्षा कमी वजनाचे जन्मास आले नाही. काही बालके तर चार किलोपेक्षाही जास्त वजनाची जन्मास आली आहेत.


उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून विचारपूस
दुर्गा बाळ गणेश महोत्सवासाठी निवडण्यात आलेल्या अंगणवाडी केंद्रांना जिल्हाधिकारी डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी काकडे यांनी सातत्याने भेटी देऊन थेट गर्भवती महिलांशी संवाद साधला. जिल्ह्यातील उच्चपदस्थ अधिकारी आपल्या आरोग्याची अशी आस्थेवाईकपणे विचारपूस करत असल्याने गर्भवती महिलांनीही आपल्या अडचणींना वाट मोकळी करून दिली. उपक्रमाच्या यशस्वितेसाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागासह आरोग्य विभागाच्या वारंवार बैठका घेऊन गर्भवती महिलांशी चर्चेतून समोर आलेल्या समस्यांवर मार्गदर्शन करण्यात आले.

लोकसभाग वाढला 
कुपोषणमुक्तीसाठी दुर्गा बाळ गणेश महोत्सव जिल्ह्यात फलदायी ठरला आहे. कुपोषणाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी या लोकाभिमुख उपक्रमामध्ये लोकसहभाग वाढत असल्याने उपक्रम यशस्वी झाला आहे.
एस. व्ही. शिंगणे - उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com