esakal | नांदेडमध्ये दोन घरफोडी, लाखोंचा ऐवज लंपास  
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

नांदेड शहराच्या धनेगाव व विष्णुनगर भागात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून लाखोंचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी नांदेड ग्रामिण व शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

नांदेडमध्ये दोन घरफोडी, लाखोंचा ऐवज लंपास  

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : विष्णुनगर परिसरातील गोरक्षण हनुमान मंदीराजवळील घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सव्वातीन लाखाचा ऐवज लंपास केला. ही घटना रविवारी (ता. १५) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. 

गोरक्षण हनुमान मंदीराजवळ रेखा गणेश राशीवंत यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. त्या बांधकामासाठी त्यांनी बँकेतून पैसे काढून आणले होते. आणलेली रक्कम त्यांनी सुटकेसमध्ये ठेवले होते. त्याच सुटकेसमध्ये काही चांदीचे दागिणे होते. शनिवारी (ता. १४) ते रविवारी (ता. १५) च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून सुटकेसमधील नगदी तीन लाख रुपये व २८ हजाराचे ३५ तोळे वजनाचे चांदीचे दागिणे असा तीन लाख २८ हजार रुपयाचा ऐवज लंपास केला. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. 

शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा 

यानंतर त्यांनी शिवाजीनगर पोलिसांना माहिती दिली. शिवाजीनगर पोलिस, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, श्‍वान पथक हे घटनास्थळी दाखल झाले. मात्र चोरट्यांनी कुठलाच माग मागे ठेवला नसल्याने श्‍वान पथकाला खाली हात परतावे लागले. रेखा राशीवंत यांच्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक श्री. लष्करे करत आहेत.

हेही वाचा -  कोरोना सावट : सामाजिक बांधिलकी जोपासत विवाह स्थगीत

धनेगावमध्ये धाडसी घरफोडी...

नांदेड : चौदा तोळे सोन्याच्या दागिन्यांसह नगदी 80 हजार असा पावणेसात लाखाचा ऐवज लंपास. ही घरफोडी धनेगाव परिसरातील मुजावरपेठ येथे हे शनिवारी 14 मार्च रोजी सकाळी सात ते आठ च्या सुमारास घडली.

रौफ कॉलनी, मुजामपेठ, धनेगाव येथील शिक्षक गुलाम मोसिन अब्दुल हमीद यांचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून कपाटातील १४ तोळे वजनाचे सोन्याचे पाच लाख ८८ हजाराचे दागिने व नगदी ८० हजार रुपये असा सहा लाख ६८ हजाराचा ऐवज लंपास केला. ही चोरी शनिवारी (ता. १४) पहाटे सात ते आठच्या सुमारास झाली. कारण हे शिक्षक दाम्पत्य आपल्या मुलाच्या खासग शिकवणी वर्गाकडे गेले होते. याचा चोरट्यांनी फायदा घेऊन अवघ्या एका तासाच्या आतच सर्व घर साफ केले. 

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा 

चोरटा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून चोरट्यांनी सुरुवातीला सीसीटीव्ही कॅमेराचे डीव्हीआर कनेक्शन तोडून घरात प्रवेश केल्याचे दिसत आहे. याप्रकरणी गुलाम मोसिन यांच्या फिर्यादीवरुन नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक गोविंद खैरे हे करत आहेत. 

loading image