नांदेडमधील ‘ही’ खेडी कात टाकणार

फोटो
फोटो

नांदेड : ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत जिल्ह्यात निवडलेल्या २६ पैकी १७ गावांत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी विविध विकासकामे करण्यासाठी एक हजार ४३० कामांसाठी २४ कोटी ६१ लाख रुपयांचा ग्रामविकास आराखडा मंजूर केला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात बुधवारी (ता. ११) किनवट, हिमायतनगर, कंधार, मुखेड व लोहा या तालुक्यांतील ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत निवडलेल्या २६ गावांची आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी गावपातळीवरील शाश्वत विकासाबाबत आढावा घेतला.


यात आरोग्य, शिक्षण व रोजगार निर्मितीबाबत मार्गदर्शन केले. उपलब्ध निधीतून स्मशानभूमी बांधकाम, मनरेगांतर्गत सिंचन विहिरी, वाडी-पाडे, तांडा वस्तीमध्ये विद्युतीकरण, मीटर बसविणे व वाढीव खांब लावणे, कृषी विभागामार्फत शेततळी, ग्रामपंचायत इमारत बांधकाम, पिण्याच्या पाण्याची सोय, पाणंद रस्ते, महिला बचत गटांचा ग्रामसंघ तयार करणे, गावांतर्गत रस्ते, गावातील ग्रंथालय बांधकाम, गावातील शाळांना मैदान व व्यायाम शाळा उपलब्ध करून देणे, घनकचरा व्यवस्थापन, कौशल्य विकास अंतर्गत प्रशिक्षण देणे, विहीर पुनर्भरण, शाळा खोली दुरुस्ती आदी कामांना प्राधान्य देण्याचे निर्देश दिले.


ग्रामविकास आराखडा तयार


बैठकीमध्ये पूर्वीच्या १७ गावांसाठी एक हजार ४३० कामांसाठी २४ कोटी ६१ लाखांचा ग्रामविकास आराखडा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी मंजूर केला. तसेच पारवा (ता. हिमायतनगर), हटक्याळ-मोहिजा (ता. कंधार), वजरा (ता. किनवट), बामणी, कारेगाव, पारडी, टेळकी, वाळकेवाडी (ता. लोहा) या नवीन नऊ गावांतील ७५९ कामांना १६ कोटी ५५ लाखांचा आराखडा मंजुरीसाठी शासनाकडे सादर केल्याची माहिती नोडल अधिकारी जी. बी. सुपेकर यांनी दिली.

नियमितपणे बैठक घेण्याच्या सूचना


व्हीएसटीएफअंतर्गत गावांचा गतीने विकास होण्यासाठी तालुका स्तरावर संबंधित गटविकास अधिकाऱ्यांनी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात नियमितपणे बैठक घेण्याच्या सूचना केल्या.
बैठकीला जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, आरोग्य अधिकारी श्री. मुंडे, श्री. राठोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कोंडेकर, श्री. पाटील, संबंधित तालुक्याचे गटविकास अधिकारी, जिल्हा परिषदेच्या दक्षीण व उत्तर बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, उपशिक्षणाधिकारी श्री. सलगर, आमदूरकर, ‘व्हीएसटीएफ’चे नोडल अधिकारी जी. बी. सुपेकर, जिल्हा व्यवस्थापक दिवेश मराठे उपस्थित होते.

सर्व तालुक्यांमध्ये दिव्यांगांची तपासणी


(ता.दहा ते २६) डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये दिव्यांगांची तपासणी करून मोफत साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यात गावपातळीवरील सर्व दिव्यांगांनी सहभाग नोंदवून सर्व ग्रामप्रवर्तकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व दिव्यांग उपस्थित राहण्याबाबत सूचना कराव्यात.

 अरूण डोंगरे, जिल्हाधिकारी, नांदेड.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com