
Beed: जिल्ह्यातील वाढत्या कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा आणि अलिकडेच झालेल्या अपहरण, सरपंच देशमुख यांचा खुन व खंडणीसारख्या घटनांच्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या बदलीची अधिवेशनात घोषणा केल्यानंतर शनिवारी नवनीत काँवत यांची बीडचे पोलिस अधीक्षक म्हणून गृह विभागाने नियुक्ती केली.
अलीकडेच घडलेल्या सरपंच निर्घृण हत्येचे 'मूळ' आणि जिल्ह्यात वाढलेल्या माफियांचे 'कुळ' शोधण्याचे आव्हान नव्या पोलीस अधिक्षकांसमोर आहे.
मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निर्घण खुन, पवनचक्कीसाठी दोन कोटी रुपयांची खंडणी, परळीतून व्यापाऱ्याचे अपहरण या ताज्या घटनांचे पडसाद जिल्ह्यासह राज्यभरात उमटले. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांसह सत्तापक्षाच्या आमदारांनीही या मुद्द्यावर राळ उठवत जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा चिंतेचा झाला असून लोकांमध्ये भिती निर्माण झाल्याचे सांगीतले.