Navratri 2022 नवशक्तींचे नऊरंग: सहावा दिवस-रंग राखाडी ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

navratr festival

Navratri 2022 : नवशक्तींचे नऊरंग: सहावा दिवस-रंग राखाडी !

मागील पाच दिवसांत नवरात्रोत्सव संदर्भात सांस्कृतिक, सामाजिक, ऐतिहासिक आणि वैचारिक विचार चिंतन-मंथन होत असतांना अनेक विचारांचा उहापोह केला. चौथ्या-पाचव्या लेखांत पिवळा-हिरवा या रंगांविषयी थोडक्यात चिंतन झाले. पिवळा रंग म्हणजेच आई-पत्नी-बहिण इत्यादी स्त्रीशक्ती घराघरांत ज्ञान-प्रकाश-संपन्नता रूपाने सदैव आपले प्रेमसिंचन करताहेत आणि हिरवा रंग म्हणजेच आई! पृथ्वी माता! त्याचे अस्तित्व अन्नाच्या कणाकणात आढळते. हिरवा रंग निर्मितीचे प्रतिक असून हिरवा शालू, हिरवा चुडा आदि प्रतीकं ही सौभाग्याची आहेत.

हिरव्या-पिवळ्या रंगानी

नववधू ही सृष्टी सजली

संगोपन उदरात धरतीचे

आनंद-शक्ती मनी रुजली

अशाप्रकारे हे पाच दिवस श्री देवी विविध रूपांनी आपल्यामध्ये अवतरली, तीचा आशीर्वाद आणि विविध मंत्रांच्या आधारे आपल्या शरीरातील उर्जा प्रज्वलित करण्याचे कार्य सुरु आहे. अनंत रंगांची उधळण होत असतांना संपूर्ण आसमंत श्री देवी मातेच्या जयघोषाने दुमदुमून जातो आहे. हा जयघोष आपल्या आईचा, प्रचंड सहनशक्ती धारण केलेल्या स्त्री शक्तीचा असून याद्वारे तिचे विश्व-मातृत्व अधोरेखित होते आहे!

'घट आणि घट स्थापना म्हणजे काय?' घट म्हणजे भांडे किंवा घट म्हणजे 'जैसी भांडघटशरावीं । तदाकारें असे पृथ्वी !' तसेच घट म्हणजे 'म्हणौनि प्राणिजाताच्या घटीं । करूनि कंदावरी आगिठीं' मानवी शरीर! घट स्थापना हा आंतरिक विषय आहे. तो केवळ वरवरचा सोहळा नसून तो मानवी शरीर आणि आंतरिक शक्तीच्या संदर्भातील विषय आहे. श्री देवी मातेची अनंत रूपे, विविध अवताराच्या कथा किंवा मिथकं आहेत. श्री देवी मातेलाच आपण शक्ती संबोधतो. ही शक्ती समग्र स्त्री-पुरुषांमध्ये संस्थापित असून तीचा अधिवास संपूर्ण चराचरात आहे. ती म्हणजे केवळ कुणी स्त्री किंवा स्त्री-लिंग नसून संपूर्ण विश्वात तीचा संचार आहे,

अशी ती शक्ती! ती म्हणजेच आंतरिक शक्ती! या नऊ दिवसांत लोक 'घटी बसतात' म्हणजे एकांतात राहतात. बाह्यशुद्धी बरोबरच अंतःकरण शुद्धी अत्यंत महत्वाची आहे! दुर्दैवाने लोक सोवळे-ओवळे, स्पृश्य-अस्पृशता याचे पालन करतात, त्याहीपेक्षा माणसाने या नऊ दिवसांत 'घटी बसून' म्हणजेच आपला शरीररुपी घट स्थिर ठेवून अंतःशक्तीची आराधना करणे अपेक्षित आहे! या नऊ दिवसात आपल्या शरीरातील उर्जेचा मूलस्त्रोत असलेले 'मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा, सहस्त्र' या सात चक्रावर आपले लक्ष केंद्रित करून, हा शरीररुपी घटातील आंतरिक शक्ती जागृत करून मन आणि शरीर अंतर्बाह्य निर्मळ करावे! आपापल्या आंतरिक शक्तीची मनोभावे आराधना करावी! शुद्ध-शक्तिशाली बनावे!

आज सहाव्या दिवशी श्री देवी कात्यायनी रुपात प्रकट झाली आहे. कात्यायन ऋषीच्या अराधनेमुळे मातेने अवतार घेऊन महिषासुराचा वध केला, म्हणून कात्यायनी, दुर्गा, पार्वती आदी नावांनी आज तिचे पूजन केले जाते. आज कात्यायनी मातेने राखाडी रंगांची वस्त्रे परिधान केली आहेत. हा रंग म्हणजे काळा आणि पांढरा या दोन मूळ रंगांचे मिश्रण आहे. हा रंग अनेक अर्थाने महत्वपूर्ण असून दिवस-रात्रीचे प्रतिक आहे. राखाडी रंग म्हणजे तटस्थ! मोजके बोलणे, मोजकेच स्मित अगदी सर्वच गोष्टी एकदम शिस्तबद्ध आणि नियंत्रित असणाऱ्या लोकांचा राखाडी रंग आवडता असतो. शांत-संयम-आपले काम मन लावून करणे, कुणाचीही अनावश्यक स्तुती किंवा निंदा न करणे, म्हणजेच स्थितप्रज्ञ व्यक्तीना हा रंग प्रिय आहे. तेंव्हा चला, आज सहाव्या दिवशी आपण आपले मन आज्ञा चक्रावर एकाग्र करून आराधना करून अनिष्ट शक्तींना कायमचा निरोप देऊन शरीर-मन अंतर्बाह्य शुद्ध करूया! ॐ कात्यायनी माता कि जय!  

प्रा.डॉ.विठ्ठल खंडूजी जायभाये