औशात काँगेससह राष्ट्रवादी जोमात तर भाजपाचे 'वेट अँड वॉच'

जलील पठाण
Thursday, 4 February 2021

जिल्हा काँग्रेसच्या कमीटीवर अध्यक्ष म्हणून औशाचे भुमीपूत्र श्रीशैल उटगे यांची निवड झाल्यापासून औसा काँग्रेसला आलेली मरगळ निघत असल्याचे दिसत आहे

औसा (लातूर): जिल्हा काँग्रेसच्या कमीटीवर अध्यक्ष म्हणून औशाचे भुमीपूत्र श्रीशैल उटगे यांची निवड झाल्यापासून औसा काँग्रेसला आलेली मरगळ निघत असल्याचे दिसत आहे. उटगे यांनी तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांना कामाला लावले आहे.

खुद्द पालकमंत्री अमित देशमुखांनी औशात येऊन शहराध्यक्ष शकील शेख यांच्या घरी कार्यकर्त्यांसह जेवण केले. शहराच्या महत्वाच्या असणाऱ्या तिसऱ्या टप्प्याच्या रस्ता रुंदीकरणाची देशमुख यांनी पाहणी केली. देशमुखांची औशातली एन्ट्री पाहून राष्ट्रवादीही आरोप प्रत्यारोप करीत कामाला लागली असताना सध्या भाजपा मात्र वेट अॅन्ड वॉचच्याच भुमिकेत दिसत आहे.

कौतुकास्पद ! परंडातील डॉ. गजानन राशिनकरांना कर्करोगाच्या संभाव्य औषधाचे पेटंट

दोन तीन कार्यक्रमात औशाचे आमदार अभिमन्यू पवार आणि राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांनी एकमेकांची स्तुती केली होती. त्यामुळे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते संभ्रमीत झाल्याचं दिसलं होतं. आमदार पवारांनी परवा एका कार्यक्रमात चांगल्या कामाची केलेली पाठराखण याचा वेगळा अर्थ काढू नये असा समज नगराध्यक्षांना दिल्याने हा संभ्रम काही प्रमाणात मिटला आहे. तरी भाजपा आपले पत्ते अजून उघड करीत नसल्याने कार्यकर्त्यांची चुळबुळ वाढल्याचे नक्की स्पष्ट होत आहे.

मागील काही वर्षांपासून औसा तालुक्यातील काँग्रेसला आलेली मरगळ नुतन जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे झटकण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यातच त्यांनी तालुका काँग्रेसचे अध्यक्षपद बदलून दत्तोपंत सुर्यवंशी यांच्याकडे ते सोपवले आहे. दत्तोपंत हे बसवराज पाटील गटाशीही जवळचे आहेत आणि देशमुखांशीही त्यांचे स्नेहाचे संबंध असल्याने तालुकाध्यक्षपद निवडताना श्री. उटगे यांनी सुवर्णमध्य साधला आहे.

त्यातच येणाऱ्या आक्टोबर - नोव्हेंबरमध्ये औसा पालिकेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत काँग्रेसचाच नगराध्यक्ष आणि सत्ता आणण्यासाठी सध्या काँग्रेसकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. सध्या राज्यात जरी आघाडी असली तरी औशात राष्ट्रवादीकडून लातुरच्या काँग्रेसचा औशात होत असलेला प्रवेश याला जोरदार विरोध केला जात आहे. नगराध्यक्ष अफसर शेख हे याला सोशल मिडीयावरुन विरोध करीत असताना त्याला काँग्रेस व सेनेच्या कार्यकर्त्यांकडून टार्गेट केले जात आहे. त्यातच औशात तालुका कॉंग्रेस कार्यालय स्थापण्याचा जिल्हाध्यक्षांचा निर्णय विरोध असनाऱ्या आनेकांना जिव्हारी लागल्याचे दिसून येत आहे.

सोयगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीचा धुरळा लवकरच! मतदार कार्यक्रम जाहीर

काही जणांनी तर सोशल मीडियावरुन चक्क औशातील काँग्रेसला 'गद्दार' आणि 'खुद्दार' अशा दोन गटात विभागण्याचा प्रयत्न केला आहे. शहरात जर आघाडी झाली तर काय आणि नाही झाली तर काय? याच्या रणनीत्या आखल्या जात असून काँग्रेस व राष्ट्रवादीत सध्या सोशल वॉर सुर असताना भाजपाचे आमदार अभिमन्यू पवारांनी सध्या वेट अँड वॉच ठेवल्याचे दिसून येत आहे.

पालिका निवडणुकीसाठी तिसरा पर्याय म्हणुन तिसऱ्या आघाडीकडे पाहीले जात आहे. माजी नगराध्यक्ष सुनिल मिटकरी, किरण उटगे, जयश्री उटगे यांच्यासह अनेक लोकांनी आपला संपर्क मतदारांशी सुरु ठेवल्याने औसा परिसरातील सोशलमिडीयावर मात्र निवडणुकीआधिच धुरळा उडालेला पहावयास मिळत आहे. राष्ट्रवादीची सत्ता उलथवणे एवढे सोपे नाही हे सगळ्यांना  माहीती असतानाही विरोधकांनी डॉ. अफसर शेख यांना चोहीकडून घेरण्याच्या नितीमुळे अफसर शेख हे खवळलेले सध्यातरी दिसून येत आहे. दरम्यान तालुक्यात पक्षवाढीकडे लक्ष दिले जात असल्याचे जिल्हा कॉंग्रेसचे म्हणने हे आगामी निवडणुकीचे संकेत देनारेच असल्याचे बोलले जात आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP is in full swing with Congress in Ausa BJP took stand Wait and Watch