नळदुर्गमध्ये बंधाऱ्यात आढळली मगर, वन विभागाचा दुजोरा

भगवंत सुरवसे
Friday, 25 December 2020

नळदुर्ग येथील आलियाबाद शिवारातील बोरी नदीवर बांधलेल्या उच्च पातळी बंधा-याच्या पाञात काही शेतकऱ्यांना मगर आढळल्यामुळे नागरिकात दहशत पसरली होती.

नळदुर्ग  (जि.उस्मानाबाद) :  नळदुर्ग येथील आलियाबाद शिवारातील बोरी नदीवर बांधलेल्या उच्च पातळी बंधा-याच्या पाञात काही शेतकऱ्यांना मगर आढळल्यामुळे नागरिकात दहशत पसरली होती. गुरूवारी (ता.२४) रोजी दुपारी वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाहणी केली असता सायंकाळी सुमारे पाच फुटाची मगर आढळल्याची माहिती तुळजापूर वन परिक्षेञ अधिकारी राहुल शिंदे यांनी दिली.

सोलापूर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गालगत अलियाबाद पुलाजवळील स्मशानभूमीच्या दक्षिणेस उच्च पातळी बंधा-यातच्या बोरी नदी पाञात मगर पहिल्यांदा मगर दिसल्याची माहिती या परिसरातील शेतकरी देत होते, मगरीच्या अधिवासाने या परिसरातील शेतकऱ्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  वन विभाग तुळजापूरचे वनक्षेञ अधिकारी राहूल शिंदे यांनी श्री चव्हाण,  विनायक पवार व आणखी एका वन मजुरासह गुरूवार दुपारपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत पाहणी केली असता मगर आढळून आली.

धक्कादायक! कोरोनावर मात केलेल्या महिलेच्या शरीरात झाला पस; जगातील सातवी, तर भारतातील पहिलीच केस

दोन महिन्यापूर्वी १४ ऑक्टोबर रोजी झालेल्या अतिवृष्टी दरम्यान मगर या भागात आली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आसून परिसरात पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे. कारण दोनच वर्षापूर्वी बोरी नदीवर उच्चपातळी बंधारा बांधला आहे व सलग दोन वर्षे हा बंधारा तुडूंब भरला आहे.  दरम्यान या ठिकाणी उपस्थित शेतकऱ्यांना श्री शिंदे यांनी सतर्क राहण्याबाबत मार्गदर्शन केले आहे. या ठिकाणी पशुपालक आपली जनावरे चारण्यासाठी आणतात व याच ठिकाणी पाणी पिण्यसाठी सोडतात यामुळे भविष्यात दुर्घटना घडू शकते.

दोन वनमजूर या ठिकाणी पुढील दोन तीन दिवसासाठी तैनात केले असून उद्या या ठिकाणी नागरिकांनी सतर्क राहून काळजी घेण्याबाबत माहिती फलक लावणार आहे. शेतकऱ्यांसह कोणीही अलियाबाद पुल व उच्च पातळी बंधार्यासह नदी पाञात उतरू नये व पशुसह इतराना या ठिकाण पासून दुर ठेवावे. 
- राहुल शिंदे, वनपरिक्षेञ अधिकारी, तुळजापूर.

(edited by- pramod sarawale) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: near Naldurg found Crocodiles forest department confirms