गंजगोलाईलाच होती फिजिकल डिस्टन्सिंगची खरी गरज, लातूरकरांना उलगडा

विकास गाढवे
शुक्रवार, 22 मे 2020

वयाची शंभरी पार केलेले शहराचे वैभव, बाजारपेठेचे शिस्तबद्ध नियोजनाचे प्रतीक असलेली ऐतिहासिक वास्तू म्हणजेच गंजगोलाई. सत्तरच्या दशकापर्यंत तिचा लौकिक कायम होता. त्यानंतरच्या अतिक्रमण आणि गर्दीने तिचा जीव गुदमरला, तसे तिचे वैभव संपत चालले. चौथ्या टाळेबंदीमध्ये गंजगोलाई परिसरातील बाजारपेठ सुरू करताना वाहनांची पार्किंग हेच गर्दीचे कारण प्रशासनाला कळून आले.

लातूर : वयाची शंभरी पार केलेले शहराचे वैभव, बाजारपेठेचे शिस्तबद्ध नियोजनाचे प्रतीक असलेली ऐतिहासिक वास्तू म्हणजेच गंजगोलाई. सत्तरच्या दशकापर्यंत तिचा लौकिक कायम होता. त्यानंतरच्या अतिक्रमण आणि गर्दीने तिचा जीव गुदमरला, तसे तिचे वैभव संपत चालले. चौथ्या टाळेबंदीमध्ये गंजगोलाई परिसरातील बाजारपेठ सुरू करताना वाहनांची पार्किंग हेच गर्दीचे कारण प्रशासनाला कळून आले. त्यानंतर नो पार्किंग केली आणि गंजगोलाईने पहिल्यांदाच मोकळा श्वास घेतला. काही वर्षांतील आणि दोन दिवसांपासून बदललेली परिस्थिती पाहता गंजगोलाईलाच खरी फिजिकल डिस्टन्सिंगची गरज होती, याचा उलगडा आता लातूरकरांना झाला आहे.

जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनीही आपल्या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात या गंजगोलाई परिसरात केलेला बदल तातडीने आचरणात आणल्याबद्दल व्यापाऱ्यांचे कौतुक केले. याशिवाय माझा हा निर्णय कदाचित अनेकांना टोचत असेल. मात्र, काही काळानंतर तुम्ही मला ओळखाल. हा निर्णय गरजेचा व काळानुरूप होता. टाळेबंदी सोडाच परंतु गंजगोलाईत ही गोष्ट गरजेची होती, असे सर्वांना वाटेल आणि लॉकडाउननंतरही हा बदल कायम गरजेचा वाटेल. तेव्हा निर्णयाला पाठिंबा देऊन सर्वजण काम करतील, अशी आशाही श्रीकांत यांनी व्यक्त केली.

सामान्यांना दिलासा देण्यात महाविकास आघाडी अपयशी, भाजपचे आंदोलन

गंजोगालाई परिसराची वर्षानुवर्षाची कोंडी दूर करण्यासाठी वाहनांची पार्किंग एवढे साधे कारण असेल, असे कधीच कोणाला वाटले नव्हते. टाळेबंदीमुळे कोंडी समस्येची पार्किंगशी जुळलेली नाळ सापडली आणि लागलीच अंमलबजावणी केली. मागील आठवड्यातील बुधवारची गर्दी पाहून भयभीत झालो होतो. मात्र, बुधवारी (ता.२०) कापड मार्केट सुरू झाल्यानंतर निर्णयाचे दृश्य परिणाम दिसले. व्यापारी व कामगारांचा प्रतिसाद तसेच लोकप्रतिनिधी, महापालिका कर्मचारी व पोलिसांच्या मदतीने हे सर्व घडून आल्याचे सांगत श्रीकांत यांनी समाधान व्यक्त केले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Need Social Distancing Follows At Gangolai Latur