esakal | सेलू तालुक्यातील कसुरा नदीवर कोल्हापुरी बंधारे उभारण्याची गरज
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूरी बंधारा

सेलू तालुक्यातील कसुरा नदीवर कोल्हापुरी बंधारे उभारण्याची गरज

sakal_logo
By
विलास शिंदे

सेलू ( जिल्हा परभणी ) : तालुक्यातून वाहणाऱ्या कसुरा नदीवर कोल्हापुरी बंधारे उभारुन वाहून जाणारे पाणी अडवले तर या भागातील शेकडो हेक्टर शेतीला पाण्याची सोय होऊ शकते. मात्र अनेक वर्षांपासून या संदर्भात संबधित विभागाने कुठलेच पाऊल उचलले जात नसल्याने दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून जात आहे.

सेलू तालुक्याला लागून असलेल्या जालना जिल्ह्यातील अंगलगाव परिसरातून कसुरा नदीचा उगम आहे. आहेर बोरगाव, रवळगाव, कुंडी, ढेंगळी पिंपळगाव, सोन्ना परिसरातून ही नदी वाहते. मगर सावंगी येथे दुधनाला जाऊन कसुरा नदी मिळते. सेलू तालुक्यातून जवळपास ३३ कि. मी. परिसरातून कसुरा नदी वाहते. काही ठिकाणी नदीचे पात्र अरुंद असले तरी चांगला पाऊस झाल्यानंतर कसूरा नदीला पाण्याचा ओघ मोठ्या प्रमाणावर असतो. अनेक वेळा कुंडी येथील सेलू ते पाथरी रस्त्यावरील पुलावरुन पाणी वाहते त्यामुळे अनेक वेळा वाहतूक ठप्प होते.

हेही वाचा - भोकरमध्ये नव्या इमारतीच्या उद्घाटनापूर्वीच फुटले वादाचे 'नारळ'

तसेच ढेंगळी पिंपळगाव येथील पुलावरुन पाणी जाते. त्यामुळे पाथरी आणि परभणीकडे जाणारी वाहतूक काही वेळ बंद पडते. कसुरा नदीला आलेल्या पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी किमान तीन मोठे कोल्हापुरी बंधारे उभारुन पाणीसाठा केला तर शेती तसेच या भागातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची सोय होऊ शकते. दुधना प्रकल्पाच्या पाण्यापासून वंचित असलेल्या या भागातील गावांना कसुरा नदीवर बंधारे उभारुन पाणी उपलब्ध करुन दिल्या जाऊ शकते. असे जल तज्ज्ञांचे मत आहे.

यापूर्वी कसुरा नदीवर काही ठिकाणी लघू सिंचन आणि जिल्हा परिषदकडून छोटे बंधारे बांधले. मात्र त्याची पाणी साठवण क्षमता खूपच कमी आहे. दरम्यान, कसुरा नदीवर कोल्हापुरी बंधारे चांगल्या उंचीचे उभारुन पाणीसाठा वाढवला जाऊ शकतो. कसुराचे दरवर्षी पाणी दुधनामार्गे नांदेड येथील विष्णूपुरीमध्ये नंतर दुसऱ्या राज्यात जाते.

येथे क्लिक करा - उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळण्याची घोषणा २०१८ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली होती

कसुरा नदीवरील अनेक भागात उन्हाळ्याच्या अखेरीस पाणी टंचाई निर्माण होते. या नदीवर कोल्हापुरी मोठे बंधारे उभारुन पाणीसाठा केला तर जमिनीतील पाणी पातळीत वाढ होवुन रब्बी हंगामातील पिकांसाठी देखील पाणी मिळू शकते. अशी प्रतिक्रिया म्हाळसापुर ता. सेलू येथील शेतकरी गुलाब शिंदे यांनी दिली.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image
go to top