Congress Beed : जिल्ह्यातही काँग्रेस जोडण्याची गरज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Congress

Congress Beed : जिल्ह्यातही काँग्रेस जोडण्याची गरज

बीड : राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर मातब्बरांनी पक्ष सोडल्याने व नंतर गटातटामुळे जिल्ह्यात मर्यादीत राजकीय ताकद झालेल्या पक्षातील गट - तट आता कमी झाले आहेत. मात्र, पक्षाची ताकद वाढविण्यासाठी नेत्यांच्या जिल्हाभर दौऱ्यांची गरज आहे. होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ताकद दाखविण्यासह आगामी नगर पालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत ताकद दाखविण्यापेक्षा मित्रपक्ष राष्ट्रवादीसोबत जागा वाटपात नेते किती मुत्सद्देगिरी दाखवितात यावरही पक्षाचे जिल्ह्यातील भवितव्य अवलंबून आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यात अलीकडे यात्रा चांगलीच चर्चेतही आली असून जिल्ह्यातील नेते देखील गांधींसमवेत यात्रेत सहभागाचे सोशल मीडियावर फोटोसेशन करत आहेत. मात्र, आता जिल्ह्यात पक्षाची पुनर्बांधणी कशी करतात हे महत्त्वाचे आहे. १९९९ ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर पक्षातील अनेक मातब्बर नेते काँग्रेसमधून राष्ट्रवादीत गेले. त्यानंतर पक्षात उर्वरित नेत्यांमध्येही कायम गट - तटाच्या भिंती उभारल्या. पक्ष वाढविण्यापेक्षा एकमेकांची जिरवण्यातच नेत्यांची ताकद खर्ची केली. दरम्यान या वर्षभरात पक्षाने जिल्ह्याच्या संघटनेतही बदल केला असून ज्येष्ठ नेत्या रजनी पाटील यांना राज्यसभेवरही संधी दिली आहे.

रजनी पाटील सोनिया गांधी यांच्या वर्तुळातील मानल्या जातात. त्यांना पक्षाने जम्मू काश्मीरसह इतर राज्यांचे प्रभारीपद देखील दिलेले आहे. श्रीमती गांधी यांच्यासह माजी राहुल गांधी व विद्यमान अध्यक्ष मल्लीकार्जुन खर्गे अध्यक्ष असलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीत श्रीमती पाटील यांना स्थान आहे. दरम्यान, राज्यसभेवर निवडीनंतर पंधरवड्याला जिल्ह्यात दौरा करु असे म्हणालेल्या श्रीमती पाटील आता हे आश्वासनच विसरल्या की काय, असा प्रश्न आहे.

त्यांच्यामुळे जिल्हाध्यक्षपदाची माळ मिळाल्यानंतर मोठ्या हुरुपाने कामाला लागलेले राजेसाहेब देशमुख देखील पुन्हा अंबाजोगाई सीमित झाल्याचे चित्र आहे. केज नगर पंचायत निवडणुकीत पक्षाच्या कामगिरीचे आत्मचिंतन करून रणनीती आखून जिल्हाभर पक्षवृद्धीसाठी म्हणावे तेवढे प्रयत्न झालेले नाहीत. आता राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे सोशल मीडियावर फोटो सेशन करण्यापेक्षा तेथून ऊर्जा घेऊन त्याचा जिल्ह्यात पक्षवृद्धीसाठी उपयोग व्हावा, अशी अपेक्षा पक्षाला मानणाऱ्या कार्यकर्त्यांची आहे.

निवडणुकांतील कामगिरी; मुत्सद्देगिरीकडे लक्ष

अगोदर मातब्बर सोडून गेल्याने व नंतर गटतटामुळे जिल्ह्यात राजकीय ताकदीला मर्यादा आलेल्या पक्षाला पुन्हा जिल्ह्यात नवसंजीवनी मिळावी यासाठी श्रेष्ठींनी चांगले पदेही दिली. आता जिल्ह्यात ७०४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत पक्ष किती ताकद दाखवितो हे महत्त्वाचे आहे. पक्षाचा पूर्वीपासून राष्ट्रवादी मित्रपक्ष होता आता त्यात शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भर पडली आहे. त्यामुळे नगर पालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जागा पदरात पाडून घेण्याची मुत्सद्देगिरी पक्षाला दाखवावी लागणार आहे. जेव्हा पक्ष आपल्या ताकदीनुसार जागा वाटप करुन घेऊन लढेल तेव्हा कार्यकर्त्यांचाही हुरुप वाढेल. तथापि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने जिल्ह्यात चिन्हच गोठविले आणि सर्वच जागा राष्ट्रवादीच्या हवाली केल्या होत्या. आता त्याची कसर भरुन काढण्याची संधीही जिल्ह्यातील नेत्यांना आहे.

राष्ट्रवादीसोबत जागा वाटपात दाखवावी मुत्सद्देगिरी

ग्रामपंचायतीसह पालिका व झेडपी निवडणुकीतील कामगिरीकडे लक्ष