फक्त अर्ध्या अन् पाव गुणाने जाणार एमपीएससीचा निकाल, आयोगाकडून अपूर्णांकाचा आधार

विकास गाढवे
Wednesday, 23 September 2020

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नकारात्मक गुणांची नवीन पद्धत जाहीर केली आहे. त्याचा काय परिणाम होईल हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

लातूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) स्पर्धा परीक्षेच्या निकालासाठी निगेटिव्ह अर्थात नकारात्मक गुणांची नवी पद्धत नुकतीच जाहीर केली आहे. पूर्वी तीन प्रश्नांचे उत्तर चुकल्यानंतर एका प्रश्नांचे गुण कमी करण्यात येत होते. नवीन पद्धतीत चार प्रश्नांचे उत्तर चुकल्यास एका प्रश्नांचे गुण म्हणजेच प्रत्येक चुकीच्या प्रश्नांसाठी पंचवीस टक्के (पाव) गुण कमी केले जाणार आहेत.

लातुरातील पथदिव्यांना बसणार ‘टायमर’, वीजबचतीसह मनुष्यबळही वाचणार

आयोगाने निगेटिव्ह गुणांचा टक्का कमी केल्याचे गाजर दाखवून निकाल मात्र, अपूर्णांकात जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मोठ्या संख्येने उमेदवारांचे नुकसान होणार आहे. पूर्वी एक किंवा दोन गुणांमुळे उमेदवारांचा निकाल जायचा, तर नव्या पद्धतीमुळे अर्ध्या व पाव गुणाने निकाल जाणार आहे.आयोगाने आठ सप्टेंबरला जाहीर केलेल्या या पद्धतीची खरी मेख उमेदवारांच्या उशिराने लक्षात आल्याने नकारात्मक गुणांचा टक्का कमी झाल्याचा आनंद ओसरला आहे. आयोगाच्या स्पर्धा परीक्षा मोठ्या संख्येने उमेदवार देतात.

प्रश्नपत्रिका कठीण काढूनही उमेदवारांच्या गुणवत्तेपुढे आयोगाला हतबल होण्याची वेळ येते. यामुळेच आयोगाने २००९ पासून नकारात्मक गुणांची पद्धत सुरू केली. चुकीच्या तीन प्रश्नांसाठी एका प्रश्नांचे गुण कमी केलेल्या एका प्रश्नाचे उत्तर चुकल्यास ३३ टक्के गुण कमी व्हायचे. या पद्धतीमुळे मोठ्या संख्येने उमेदवार स्पर्धेतून बाहेर जाऊ लागले. या पद्धतीत एकूण गुण अपूर्णांकात आले तरी आयोगाकडून उमेदवारांना पूर्णांकांतच (राऊंड फिगर) गुण दिले जायचे. या पद्धतीने अकरा वर्ष आयोगाचे काम भागले.

रस्ता चांगला की खराब? कळणार एका क्लिकवर, लातूर जिल्ह्यासाठी खास सॉफ्टवेअर

मात्र, गेल्या काही वर्षांतील उमेदवारांची गुणवत्ता पाहता आयोगाला नाईलाजाने अपूर्णांकाचा आधार घ्यावा लागला. पदांची संख्या कमी झाली आणि परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची संख्या वाढली. यात कितीही कठीण व गोंधळात टाकणारे प्रश्न विचारूनही उमदेवार या प्रश्नांचे अचूक उत्तर देत असल्याने मोठ्या संख्येने उमेदवारांना स्पर्धेतून बाहेर काढण्यासाठी आयोगाकडे कोणताच मार्ग नव्हता.

यामुळेच निगेटिव्ह गुणांचा टक्का कमी करत अपूर्णांकांत निकाल जाहीर करण्याचा फंडा आयोगाने स्वीकारल्याची चर्चा उमेदवारांमध्ये आहे. याबाबत आयोगाचे सहसचिव सुनिल औताडे यांनी नवीन नकारात्मक गुणांची पद्धत व अपूर्णांकात निकाल जाहिर करण्याचा निर्णय आयोगाने घेतल्याचे सांगत त्यापलीकडे मी बोलू शकत नसल्याचे स्पष्ट केले.

असा लागणार `निकाल`!
आयोगाची एका प्रश्नाच्या चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश गुण कमी करण्याची निगेटिव्ह गुणांची पद्धत यापुढे जाहीर होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांच्या निकालासाठी लागू होणार आहे. यामुळे यापूर्वी झालेल्या परीक्षांचा निकालही याच पद्धतीने लागणार आहे. यात एका प्रश्नाला एक गुण असल्यास एका प्रश्नाच्या चुकीच्या उत्तरासाठी पाव तर दोन गुण असल्यास अर्धागुण कमी होणार आहे.

यामुळे पाव किंवा अर्धागुण जास्त असलेल्या उमेदवारांची निवड होणार आहे. यात कटऑफच्या अगदीजवळ पोचल्यानंतर अर्धा आणि पाव गुणाने जाणारा निकाल खूपच वेदनादायी ठरणार असल्याची भावना उमेदवारांत आहे. दरम्यान नवीन पद्धतीने समान गुणांचे प्रकार वाढण्याची शक्यता असून सरकारने ठरवून दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार उमेदवारांची निवड करताना आयोगाचा कस लागणार आहे.
 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Negative Marks Systme Affect MPSC Aspirants Result