
परळी वैजनाथ तालुक्यातील पांगरी येथील नवविवाहितेने मंगळवारी (ता.एक) आत्महत्या केल्याची घटना घडली होती. तिच्या पाठोपाठ पतीनेही गळफास घेऊन आत्महत्या केली.
परळी वैजनाथ (जि.बीड) : तालुक्यातील पांगरी येथील नवविवाहितेने मंगळवारी (ता.एक) आत्महत्या केल्याची घटना घडली होती. तिच्या पाठोपाठ पतीनेही गळफास घेऊन आत्महत्या केली. या संदर्भात मुलीच्या वडीलाने माझ्या मुलीचा तिचा पती आणि इतरांनी हुंड्यासाठी छळ केल्यानेच आत्महत्या केल्याची तक्रार ग्रामीण ठाण्यात दिली. मृत पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पांगरी येथील नवविवाहित प्रियंका व सायस पंडित यांचा जून महिन्यात विवाह झाला होता. ठरलेल्या एक लाख रुपये हुंड्यापैकी ४० हजार रुपये आणि इतर सामान लग्नात देण्यात आले.
सुरुवातीचे दोन महिने चांगले गेल्यानंतर हुंड्यातील बाकी ६० हजार रुपये आणि घराच्या बांधकामासाठी आणखी ५० हजार रुपये माहेरहून घेऊन ये म्हणून पती सायस पंडित, सासू वेणूबाई विलास पंडित, मावस दीर सुदर्शन गंगाधर पैठणे आणि नणंद बायडी अनिल वाव्हळे यांनी प्रियंकाचा छळ सुरु केला. तिला शिवीगाळ करुन मारहाण करण्यात आली. या त्रासाबद्दल प्रियंकाने वारंवार वडिलांना सांगितले. दिवाळी आटोपून सासरी परत जाताना वडिलांनी तिच्या सासऱ्याजवळ अतिशय गरीब परिस्थितीमुळे पैसे देण्यास उशीर होत असल्याचे सांगितले आणि नियोजन झाले कि पैसे देतो असे सांगितले.
तरीदेखील प्रियंकाचा सासरी छळ होतच राहिला. अखेर सततच्या छळास कंटाळून प्रियंकाने मंगळवारी सायंकाळी ६ वाजता विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यानंतर तिचा पती सायस याने देखील गळफास घेऊन आत्महत्या केली असे प्रियंकाचे वडील अरुण नामदेव गायकवाड (रा. तळेगाव) यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. या फिर्यादीवरून प्रियंकाचा मृत पती, सासू, दीर, मावस दीर आणि नणंद या पाच जणांवर ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शहाणे करित आहेत.
संपादन - गणेश पिटेकर