तलमोड नाक्‍यावर कंटेनर घुसला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

रविवारी पहाटे घडलेल्या घटनेत दोन कामगार जखमी झाले. तसेच केबिनचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, अपुऱ्या सुविधांमुळे या टोल नाक्‍यावर वाहनचालकांची गैरसोय होत आहे.

उमरगा (जि. उस्मानाबाद) : तालुक्‍यातील तलमोड शिवारात नव्याने सुरू करण्यात आलेल्या पथकर वसुली नाक्‍यावर कंटेनरने जोरदार धडक दिल्याने केबिनचे मोठे नुकसान झाले. या धडकेत करवसुली करणारे दोन कामगार जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी (ता. नऊ) पहाटेच्या सुमारास झाला. दरम्यान, नाक्‍यावर अवजड वाहनांसाठी दोन केबिनमधून जाणारा रस्ता अरुंद असल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. तर टोलनाका प्रशासनाने कंटेनर वेगाने व निष्काळजीपणाने धडक दिल्याचे म्हटले आहे. 

राष्ट्रीय महामार्ग रस्ता चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले नसताना तीन फेब्रुवारीला तलमोड गावाजवळ पथकर नाका सुरू करण्यात आला आहे. चौपदरीकरणाचे काम दर्जेदार करण्याकडे संबंधित कंपनीकडून सुरवातीपासुनच दुर्लक्ष झालेले आहे. रविवारी पहाटे पथकर नाक्‍यावरील फास्टॅगच्या मार्गाने जाणाऱ्या कंटेनरने (एचआर- 55, क्‍यू- 0367) जोरदार धडक दिल्याने केबिन क्रमांक चारचे मोठे नुकसान झाले.

हेही वाचा : क्राईम सिरियल पाहून जुन्या प्रियकराने काढला काटा 

या धडकेत करवसुली करणारा कर्मचारी सुप्रीम दिलीप बोरसे (वय 30, रा. अर्नद बुद्रुक, ता. चोपडा, जि. जळगाव) जखमी झाला आहे. पोटासह शरीराच्या अन्य भागांवर काचा घुसल्याने हा युवक गंभीर जखम झाला आहे. त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे, तर आणखी एक कामगार किरकोळ जखमी झाला आहे. याप्रकरणी सुप्रीम बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कंटेनरचालक राजेशकुमार ब्रह्मप्रसाद सरोज (रा. पुरणापूर खास, ता. लालगंज, उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. बीट अंमलदार मिलिंद सागळे तपास करीत आहेत. 

हेही वाचा : पशुंच्या जगातून बाळ माणसांच्या दुनियेत... 

सोयीसुविधांकडे दुर्लक्ष 
राष्ट्रीय महामार्गावरून अनेक राज्यांतील विविध कंपन्यांचे ट्रॅक्‍टर, ऑटो, कारची वाहतूक करणारे अवजड ट्रेलर, कंटेनर अशा अवजड वाहनांची संख्या मोठी आहे. पथकर नाक्‍याचे बांधकाम करतानाच अशा अवजड व रुंदीच्या वाहनांसाठी किमान आठ फुटांपेक्षा अधिक अंतर आवश्‍यक असताना या बाबीचा विचार केला गेला नाही. अवजड वाहने व्यवस्थित बाहेर पडण्यासाठी सुरक्षित सुविधा असायला हवी. तरच भविष्यात ही वित्त व जीवितहानीचे प्रकार घडणार नाहीत. पथकर नाका प्रशासनाने अवजड वाहनांसाठी सुरक्षित मार्गाची व्यवस्था करून देण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about accident