शेतीशिवार हिरवे, पाणीसाठे कोरडे

अब्बास सय्यद
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

यंदाच्या पावसाळ्यात आत्तापर्यंत तालुक्‍यात केवळ 240 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अधूनमधून झालेल्या रिमझिम पावसाने शेतशिवार हिरवे झाले आहे; मात्र विहिरी, प्रकल्प कोरडे असल्याने दुष्काळाच्या झळा कायम आहेत.

भूम (जि.उस्मानाबाद) : यंदाच्या पावसाळ्यात आत्तापर्यंत तालुक्‍यात केवळ 240 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अधूनमधून झालेल्या रिमझिम पावसाने शेतशिवार हिरवे झाले आहे; मात्र विहिरी, प्रकल्प कोरडे असल्याने दुष्काळाच्या झळा कायम आहेत. त्यामुळे हिरवळीत दुष्काळ लपल्याचे चित्र दिसून येत आहे.

यंदा पावसाने तालुक्‍यात चांगली सुरवात केल्याने शेतकऱ्यांनी खरीप पेरणी केली. पण त्यानंतर दमदार पाऊस झाला नाही. रिमझिम पावसाने शेतीशिवार हिरवे झाले. पण याचवेळी पावसाने मोठा खंड दिल्याने ऐन बहारात असलेली खरिपाची पिके माना टाकू लागली आहेत. 

गेल्या महिन्यात ढगाळ वातावरण होते. अधूनमधून रिमझिम पाऊसही झाला. मात्र दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पावसाळ्याचे तीन महिने जवळपास संपत आले तरी या भागात आत्तापर्यंत केवळ 240 मिलिमीटर पाऊस झाल्याने आजही विहिरी, नद्या, नाले कोरडे आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी भरपावसाळ्यात भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. शेतशिवारात अद्यापही चारा उपलब्ध झाला नाही. त्यामुळे पशुधन सांभाळायचे कसे, असा प्रश्न आहे. सध्या कडक ऊन पडत असून, पावसाने ओढ दिल्याने खरिपाची पिके हातची जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. सध्या काही भागांत सोयाबीन, उडीद, मूग फुलोऱ्यात तर काही भागांत शेंगा लागलेल्या अवस्थेत आहे. फुलोऱ्यातील तूर, कापूस, मका पिकांवर मावा कीड लागल्याने पिकांना मोठा फटका बसला आहे.

येत्या चार-पाच दिवसांत मोठा पाऊस न झाल्यास हातातोंडाशी आलेली खरिपाची पिके जाण्याची शक्‍यता शेतकरी व्यक्त करीत आहेत. 
पावसाळ्याचे तीन महिने संपत आले तरी तालुक्‍यात 33 टॅंकर व 43 अधिग्रहणांद्वारे 33 गावांना पाणीपुरवठा होत आहे. बहुतांश गावांत आजही पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about Drought